अशोक मुरूमकर
माढा विधानसभा मतदारसंघात या निवडणुकीत रणजितसिंह शिंदे उभा राहणार आहेत. ते अपक्ष राहतील की ‘तुतारी’ घेऊन उभारतील हे माहित नाही मात्र ते उभारतील. करमाळ्यात संजयमामा हे देखील अपक्षच राहतील असे वाटत आहे त्यांना साथ द्या, असे आवाहन माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांनी केले आहे.
माढा तालुक्यातील बारलोणी येथे जनसंवाद कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्याच्या निमित्ताने आमदार संजयमामा शिंदे व आमदार बबनदादा यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आमदार बबनदादा शिंदे म्हणाले, ‘माढ्यात ३० वर्षात मी व करमाळ्यात संजयमामा यांनी पाच वर्ष चांगले काम केले आहे. अनेक विकास कामे मार्गी लावली आहेत. आमदार संजयमामा शिंदे यांनीही करमाळ्यात पाच वर्षात ३ हजार कोटींची विकास कामे केली आहेत.
पुढे बोलताना ते म्हणाले, उजनी धरणाच्या बॅक्वॉटर भागात भीमा नदीवर ढिकसळ पूल, इंदापूरला जोडणारा एक पूल होत आहे. हॅम अंतर्गत ७१ किलोमीटरचा एक रस्ता होत आहे. अपक्ष असतानाही एखाद्यावर निष्ठा ठेवली तर त्याचे फळ मिळते हे आमदार संजयमामा शिंदे यांचे उदाहरण आहे. त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे पाठपुरावा करून निधी मिळवला. माढा व करमाळ्यातील विकास कामे करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. यापुढेही विकास कामे केली जाणार आहेत. मतदारसंघातील तरुणांना रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी प्रयत्न केले जात आहेत. उजनी पर्यटन विकास आराखड्यातून मोठा रोजगार आमदार संजयमामामुळे तयार होणार आहे, असेही ते म्हणाले आहेत.
‘या निवडणुकीत मुलगा रणजितसिंह शिंदे हे उभारतील. त्यांना तुतारी मिळेल की नाही माहित नाही पण ते उभारणार आहेत. तुतारी किंवा अपक्ष म्हणून ते या निवडणुकीत उतरतील त्याला व करमाळ्यात संजयमामा यांना साथ द्या, असे आमदार बबनदादा शिंदे हे यावेळी म्हणाले आहेत. या मेळाव्यात मोठे शक्तिप्रदर्शन करण्यात आले. आमदार संजयमामा शिंदे यांनी करमाळ्यात केलेल्या विकास कामाची माहिती मनोगतात दिली. करमाळ्यातही आपल्याला चांगले वातावरण असल्याचे ते म्हणाले.