करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सर्व कारखान्यांनी शेतकऱ्यांची थकबाकी दिवाळीपूर्वी द्यावी अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकरी कामगार संघर्ष समितीचे संस्थापक अध्यक्ष दशरथ कांबळे यांनी दिला आहे.
करमाळा तालुक्यामध्ये दोन सहकारी तर दोन खाजगी साखर कारखाने आहेत. यापैकी मकाईने सहकारी साखर कारखाना आधीपासुनच ऊसतोडणी कामगार, शेतकरी, कामगार तसेच इतर ही काही देणी थकल्यापमुळे अडचणीत आहे. आदिनाथकडून शेतकऱ्यांच्या ऊसाला परत एकदा योग्य भावासह पैसे मिळतील, अशी आशा होती. परंतु तसे झाले नाही. भैरवनाथ, कमलाई साखर कारखाना व गोविंदपर्व गुळ कारखाना हे खाजगी कारखाने आहेत. त्यांच्याकडेही शेतकऱ्यांची देणी आहेत.
कांबळे म्हणाले, करमाळा तालुक्यातील मुजोर कारखानदारांना, शेतकऱ्यांनी प्रामाणिकपणे ऊस दिला. ऊस दिल्यानंतर शेतकरी, वाहतुकदार, ऊसतोडणी कामगार यांचे बील कारखानदारांनी देणे बंधनकारक असताना देखील ऊसबील दिले गेले नाही. त्यामुळे तालुक्यातील सर्व समविचारी संघटनांना सोबत घेऊन, आम्ही कारखान्याचे संचालक तथा चेअरमन यांच्या दारात जाऊन, ‘ऊस बील द्या, शेतकऱ्यांची दिवाळी गोड करा’. अशा घोषणा देत ‘भीक मांगो’ आंदोलन करणार आहोत. त्यामुळे ज्या कारखान्यांवर आर.आर.सी. अंतर्गत कारवाई झालेली आहे. अशा कारखान्यांवर कर्तव्यदक्ष तसेच गोरगरिबांना न्याय मिळवून देण्याची भुमिका घेणाऱ्या करमाळा तहसिलदार शिल्पा ठोकडे यांनी, कारखान्यांमधील साखर व मोलॕसिस मिळेल त्या भावात विक्री करुन शेतकऱ्यांची दिवाळी गोड करावी. त्याचप्रमाणे तालुक्यातील कारखानदारांनी कारखान्यामध्ये काम करत असलेल्या, सर्वच कामगारांचा दिवाळीआधी एक महिन्याचा पगार द्यावा. जेणेकरुन कामगारांची सुद्धा दिवाळी गोड होईल. अन्यथा कारखानदारांपासुन पिडित असलेल्या शेतकरी, कामगार, वाहतुकदार, कामगार यांना सोबत घेऊन ‘भीक मांगो’ आंदोलन करण्याचा इशारा कांबळे यांनी दिला आहे.