करमाळा (सोलापूर) : खाजगी व्यवस्थापनाच्या प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळा महाविद्यालयातील कर्मचाऱ्यांसाठी काम करणाऱ्या शिक्षक भारती करमाळा संघटनेचा कार्यकारणी विस्तार करण्यात आला आहे. शिक्षक भारती ही सरकार मान्यता प्राप्त संघटना असून या संघटनेचे राज्यभर काम आहे. सोलापूर शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष सुजितकुमार काटमोरे यांच्या नेतृत्वाखाली दोन वर्षांपासून शिक्षक भारती शिक्षकांचे विविध प्रश्न सोडवत आहे.
शिक्षक भारतीची जिल्हा कार्यकारणी बैठक नुकतीच झाली. या बैठकीत करमाळा तालुका कार्यकारिणीच्या नूतन पदाधिकाऱ्यांना जिल्हाध्यक्षांच्या हस्ते निवडीचे पत्र देण्यात आले. बाळासाहेब भिसे यांची जिल्हा कार्यकारणी सदस्यपदी निवड करण्यात आली तर तालुका कार्यकारणी विस्तारामध्ये नितीनकुमार कांबळे यांची तालुका उपाध्यक्षपदी, मारुती साखरे यांची तालुका संघटक तर सुजित झांजुर्णी यांची तालुका सहसचिवपदी निवड करण्यात आली. यावेळी जिल्हाध्यक्ष काटमोरे यांनी करमाळा तालुक्याचे कार्य गौरवास्पद असून नवीन पदाधिकाऱ्यांमुळे संघटना वाढीस व कर्मचाऱ्यांचे प्रश्न सोडवण्यास यश येईल, अशा भावना व्यक्त केली.