करमाळा (सोलापूर) : बिटरगाव श्री येथे शुक्रवारपसून (ता. २५) कीर्तन महोत्सव होणार आहे. यावर्षी हा कीर्तनमहोत्सव सात दिवसांचा होणार असून गुरुवारी (ता. ता. ३१) हभप भागवताचार्य बाळू महाराज गिरगावकर यांच्या कीर्तनाने महोत्सवाची सांगता होणार आहे.
भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या या कीर्तन महोत्वाचे हे तिसरे वर्ष असून दोन वर्ष तीन दिवसांचा कीर्तन महोत्सव होत होता. यावर्षी हा सात दिवसांचा होत आहे. कै. भगवानराव शिंदे व कै. बाजीराव मुरूमकर यांच्या आशीर्वादाने हंबीरराव मुरूमकर गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हा महोत्सव होणार आहे. यांचे व्यसपीठ चालक पत्रकार मृदूंगाचार्य नाना पठाडे हे आहेत.
शुक्रवारी हा महोत्सव सुरु होणार असून यावेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलिस निरीक्षक विनोद घुगे व पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. मनीष यादव उपस्थित राहणार आहेत. हभप समाधान महाराज शर्मा, हभप विशाल महाराज खोले, हभप रामायणचार्य रामराव महाराज ढोक, हभप अनिल महाराज तुपे, हभप भागवताचार्य रुपाली सवने महाराज व हभप निवृत्ती महाराज देशमुख (इंदुरीकर) यांचे कीर्तन होणार आहे. संध्यकाळी ९ ते ११ या वेळेत रोज कीर्तन होणार आहे. गुरुवारी काल्याचे कीर्तन सकाळी ७ ते ९ यावेळेत होणार आहे.
या महोत्सवात पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ११ ग्रंथराज शिवलीला अमृत पारायण, सायंकाळी ५ ते ६ प्रवचन व ६ ते ७ हरिपाठ होणार आहे. कलश पुजन अनिल पिंपरे व सरपंच संजय रोडे, विनापुजन शंकर पाटील व नंदकुमार दळवी, प्रतिमा पूजन हरी मोरे व नितीन निकम, ग्रंथ पुजन सुजित बागल व कांतीलाल वाघमोडे, मृदूंगपूजन संदीप नलवडे व हरिशचंद्र झिंजाडे, ध्वजपूजन वंदन नलवडे व संतोष ठोबरे, टाळ पुजन हरिभाऊ झिंजाडे व चंद्रकांत चुंबळकर यांच्या हस्ते होणार आहे. बिटरगाव (श्री) ग्रामपंचायतीचे माजी सरपंच डॉ. अभिजित मुरूमकर यांच्या पुढाकारातून हा कीर्तन महोत्सव होत आहे. याचा लाभ परिसरातील भाविकांनी घ्यावा, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.