करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उद्या (ता. २८) आमदार संजयमामा शिंदे, बागल गटाचे नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल व दत्तकला शिक्षण संस्थेचे प्रमुख प्रा. रामदास झोळ हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. करमाळा तहसील कार्यालय येथे सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहेत.
करमाळ्यात महायुतीचा उमेदवार गुलदस्त्यात! नेमकी रणनीती काय? राजकीय वर्तुळात चर्चा
करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी आतापर्यंत माजी आमदार नारायण पाटील यांच्यासह 13 जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले असून 62 इच्छुकांनी 108 अर्ज घेतले आहेत. मंगळवारी दुपारी ३ पर्यंत इच्छुकांना अर्ज दाखल करता येणार आहेत. इच्छुकांनी शांततेत व अर्ज दाखल करताना कोणतीही अडचण येऊ नये याची दक्षता निवडणूक निर्णय अधिकारी अंजली मरोड व सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शिल्पा ठोकडे यांनी घेतली आहे. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी बंदोबस्त ठेवला आहे.
करमाळ्यासाठी भाजपच्या रश्मी बागल, गणेश चिवटे यांनी अर्ज घेतले आहेत. शिवसेनेसाठी (शिंदे गट) मंगेश चिवटे यांच्यासह ज्ञानदेव कदम, गणेश कराड, भारत शिंदे, अनिरुद्ध राऊत, प्रियांका गायकवाड, सुहास घोलप, गणपत भोसले, संभाजी भोसले आदींनी अर्ज घेतले आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अद्यापही जाहीर झालेला नाही. अजूनही नाव गुलदस्त्यात असून येथे महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांना रोखण्यासाठी नेमकी काय रणनीती आखली जात आहे. याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा सुरु आहे. आमदार संजयमामा शिंदे यांनी अपक्ष निवडणूक लढण्याचा निर्णय जाहीर केला आहे.
महायुतीमधील घटक पक्ष अजित पवार यांची राष्ट्रवादी, शिवसेना (शिंदे) व भाजप यांच्यात ही जागा कोणाला जाणार हे महत्वाचे आहे. महायुतीतील शिवसेनेची येथील जागा आहे. आमदार शिंदे घड्याळावर रिंगणात उतरणार नसतील तर ती जागा आम्हाला द्यावी, अशी मागणी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे यांची आहे. तर भाजपचे दिग्विजय बागल या जागेसाठी प्रयत्न करत आहेत. भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांनी निष्ठावंतांना जागा द्या, अशी मागणी केली आहे. त्यामुळे येथील जागेचा सस्पेन्स आहे. येथील जागा कोणाला मिळणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. अशा स्थितीत सोमवारी इच्छुक अर्ज दाखल करणार आहेत.