करमाळा (अशोक मुरूमकर) : बागल गटाचे नेते मकाई सहकारी साखर कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला आहे. विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश चिवटे, मुख्यमंत्र्यांचे ओएसडी मंगेश चिवटे, मकाईचे संचालक आशीष गायकवाड, अध्यक्ष दिनेश भांडवलकर, धनंजय डोंगरे, देवा ढेरे आदी उपस्थित होते.
करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी बागल यांना महायुतीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेची उमेदवारी मिळाली आहे. त्यांनी सोमवारी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला होता. तेव्हाच त्यांनी मंगळवारी दुसरा अर्ज दाखल करणार असल्याचे सांगितले होते. त्यानंतर ते लगेच मुंबईकडे रवाना झाले होते अशी चर्चा होती. दरम्यान चिवटे यांनी बागल कुटुंबात शिवसेनेची उमेदवारी अशी फेसबुक पोस्ट केली होती. त्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु असतानाच बागल यांनी शिवसेनेत प्रवेश केला.
दिग्विजय बागल यांचा करमाळ्यासाठी उमेदवारी अर्ज दाखल
दिग्विजय बागल यांनी विधानसभा निवडणूक लढवावी अशी मागणी कार्यकर्त्यांची होती. दिग्विजय बागल यांच्या बहीण गटाच्या नेत्या रश्मी बागल या २०१४ मध्ये विधानसभा निवडणुकीत उतरल्या होत्या. त्यांना ६० हजार ४१७ मते मिळाली होती. त्यानंतर २०१९ मध्ये त्यांनी ऐन निवडणुकीच्या तोंडावर अखंड राष्ट्रवादीला सोडचिट्टी देत अखंड शिवसेनेत प्रवेश केला आणि धन्युष्यबाण चिन्ह मिळवले होते. तेव्हा त्यांना ५३ हजार २९५ मते मिळाली होती. या दोन्ही निवडणुकीत बागल गटाचा पराभव झाला होता.
करमाळ्यात बागल व बार्शीत राऊत यांना शिवसेनेची उमेदवारी
लोकसभा निवडणुकीवेळी बागल गटाचे दिग्विजय बागल व रश्मी बागल यांनी भाजपात प्रवेश केला होता. या निवडणुकीत दिग्विजय बागल यांनी पुन्हा शिवसेनेत प्रवेश केला आहे. आज ते धनुष्यबाण चिन्हावर अर्ज दाखल करणार आहेत. यापूर्वी दिगंबरराव बागल मामा शिवसेनेच्या पाठींब्याने आमदार झाले होते. आता त्यांचा मुलगा निवडणुकीत उतरला असल्याची चर्चा सुरु झाली आहे.