करमाळा (अशोक मुरूमकर) : माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी करमाळा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांना पाठींबा दिला आहे. अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील, खासदार धैर्यशील मोहिते पाटील, माजी आमदार नारायण पाटील यांच्या उपस्थितीत हा पाठींबा दिला आहे.
या पाठींब्यानंतर माजी आमदार जगताप म्हणाले, ‘करमाळा तालुक्याचा विकास आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांची मोळी बांधण्याच्या दृष्टीने माजी आमदार पाटील यांना पाठींबा दिला आहे. पाच वर्षात जे राजकारण तालुक्यात झाले ते दिशाभुलीचे आणि कागदावरचे झाले. त्याला कंटाळून हा पाठींबा दिला आहे. सगळ्या लबाडी आणि या गोष्टी त्यामुळे हा पाठींबा दिला असल्याचे’ माजी आमदार जगताप म्हणाले आहेत. करमाळा विधानसभा मतदारसंघासाठी अर्ज दाखल केल्यानंतर माजी आमदार पाटील यांनी जगताप यांच्या पाठींब्याबाबत संकेत दिले होते. त्यानंतर आज हा पाठींबा जाहीर झाला आहे.
माजी आमदार जगताप यांनी २०१९ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये आमदार संजयमामा शिंदे यांना पाठींबा दिला होता. जगताप हे शिंदे यांना या निवडणुकीत पाठींबा देणार नाहीत आणि पाटील यांना ते पाठींबा देतील यांची चर्चा लोकसभा निवडणूक झाल्यापासून होती. आज त्या चर्चेला पूर्णविराम मिळाला असून जगताप यांनी अधिकृत भूमिका मांडली आहे. अकलूज येथे शिवरत्न बंगल्यावर झालेल्या बैठकीत त्यांनी ही घेतली. यावेळी पाटील गटाचे देवानंद बागल, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले, माजी सदस्य तळेकर आदी उपस्थित होते.