करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सोमवारपर्यंत (४ नोव्हेंबर) मुदत आहे. आता सर्वांना प्रचाराचे वेध लागले आहेत. त्यातच माजी आमदार जयवंतराव जगताप यांनी आमदार संजयमामा शिंदे यांची साथ सोडत शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांना पाठींबा जाहीर केला आहे. त्यांची पहिली सभा करमाळ्यात शनिवारी (ता. २) होणार आहे. याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
माजी आमदार जगताप हे २ नोव्हेंबरपासून माजी आमदार पाटील यांच्या प्रचाराच्या मैदानात उतरणार आहेत. करमाळा मतदारसंघात त्यांचा माजी आमदार पाटील यांच्याबरोबर दौरा होणार असून करमाळ्यात पहिलीच सभा होणार आहे. आमदार जगताप यांचा करमाळा शहर हा बालेकिल्ला समजला जातो. महाविकास आघाडीचे उमेदवार पाटील यांना विजयी करण्यासाठी जगताप यांनी आता कंबर कसली आहे. त्यामुळेच, ते करमाळ्यातून आपल्या निवडणूक प्रचारसभांची सुरूवात करत आहेत, असे बोलले जात आहे.
जगताप यांचा प्रचारसभांसाठीचा नियोजित दौरा आखण्यात आला असून २ नोव्हेंबर ते 17 नोव्हेंबर असा त्यांचा दौरा होणार असल्याचे सांगितले जात आहे. जगताप यांच्या मतदारसंघात जाहीर सभा होणार असल्याची माहिती वरिष्ठ सुत्रांनी दिली आहे. मविआच्या संयुक्त सभा देखील मतदारसंघात होणार आहेत. खासदार सुप्रिया सुळे, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, खासदार अमोल कोल्हे, सुषमा अंधारे यांच्याही विधानसभा निवडणुकांसाठी प्रचारसभांमधून आपली तोफ धडाडणार आहे. त्यामुळे, दिवाळीनंतरच खरे फटाके फुटणार आहेत, असे सांगितले जात आहे.