करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमदेवार माजी आमदार नारायण पाटील यांना विजयी करण्यासाठी बागल गट सोडत मकाई सहकारी साखर कारखान्याचे संचालक किरण कवडे यांनी शरद पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे. करमाळा विधानसभा मतदार संघाच्या पश्चिम भाग सत्ता परिवर्त्नासाठी महत्वाची भूमिका बजावत असून या भागातील कवडे यांच्या प्रवेशाने पाटील यांना फायदा होणार आहे. यावेळी आमदार संजयमामा शिंदे व बागल गट सोडून मछिंद्र लकडे, शंकर लकडे, साहेबराव शिंदे, भारत शिंदे, शंभु कवडे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी राष्ट्रवादीत (शरद पवार गट) प्रवेश केला.
बारामती ऍग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सावितदेवी राजेभोसले, जगताप गटाचे शंभूराजे जगताप, नवनाथ झोळ, नागनाथ लकडे, संतोष वारे, संतोष खाटमोडे पाटील, उदयसिंह मोरे पाटील, धुळाभाऊ कोकरे, संजय गुटाळ, भास्करराव भांगे, रवीभाऊ कोकरे, विकास गलांडे, पंचम राजेभोसले, विलास कोकणे, देविदास साळुंखे, रामदास कोकाटे, माऊली भागडे, हनुमंत धायगुडे, दादा मोरे, काका पाटील, डॉ. प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.
माजी आमदार पाटील म्हणाले, 2014 ते 19 दरम्यान पश्चिम भागात विकासकामे केली आहेत. या भागातील पूल व रस्ते या बाबतीत अनेक वर्षे रखडलेले प्रश्न सोडवले. कोर्टी ते जिंती रस्ता, डिकसळ व केतूर पोमलवाडी पूल आणि इतर रस्ते ही कामे मार्गी लावली. उजनीच्या पुनर्वसित गावांना नागरी सुविधा मिळवून दिल्या, यापुढेही कामे करण्यासाठी मला संधी द्यावी, असे आवाहन करत विद्यमान आमदारांनी भुलथापा मारणे सोडून एक तरी ठळक काम दाखवावे, अशी टीका माजी आमदार पाटील यांनी केली. प्रास्तविक किरण कवडे यांनी केले. तर नवनाथ झोळ, सुभाष गुळवे, शंभूराजे जगताप यांची यावेळी भाषणे झाली. सूत्रसंचालन संजय फरतडे यांनी तर आभार नागनाथ लकडे यांनी मानले.