करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा विधानसभा मतदारसंघात निवडणूक अत्यंत चुरशीची होत असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. १५ उमेदवार मैदानात असले तरी अपक्ष आमदार संजयमामा शिंदे व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार नारायण पाटील यांच्या प्रमुख लढत होणार असल्याचे प्रथमदर्शनी दिसत आहे. महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल हे रेसमध्ये आले असल्याची चर्चा आहे. तर अपक्ष उमेदवार प्रा. रामदास झोळ यांचाही जोरदार प्रचार सुरु असून ते किती मत घेतील याकडे सर्वांचे लक्ष आहे.
करमाळा विधानसभा मतदारसंघात २०१४ मध्ये आमदार संजयमामा शिंदे हे पहिल्यांदा निवडणूक रिंगणात उतरले होते. तेव्हा त्यांना करमाळा तालुक्यातील सात गावात १० पेक्षा कमी मतं मिळाली होती. त्यानंतर २०१९ च्या निवडणुकीत मात्र त्यांचे मताधिक्य वाढले आणि विकास कामांच्या जोरावर त्यांचे हे मताधिक्य या निवडणुकीत देखील वाढणार असल्याचे बोलले जाऊ लागले आहे. त्यामुळे आमदार संजयमामा शिंदे यांच्यासाठी ही निवडणूक सोपी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे.
२०१४ मध्ये माजी आमदार नारायण पाटील हे ६० हजार ६७४ मते घेऊन विजयी झाले होते. यावेळी रश्मी बागल यांना ६० हजार ४१७ मते मिळाली होती तर पहिल्यांदा निवडणुकीत उतरलेले आमदार शिंदे यांना ५८ हजार ३७७ मते मिळाली होती. २०१९ मध्ये माजी आमदार नारायण पाटील यांना ७३ हजार ३२८ मते मिळाली होती. यावेळी रश्मी बागल यांना ५३ हजार २९५ मते मिळाली होती तर आमदार शिंदे यांना ७८ हजार ८२२ मते मिळाली होती.
आमदार शिंदे यांना २०१४ मध्ये हुलगेवाडीत ९ मते मिळाली होती. तर २०१९ मध्ये ४७ मते मिळाली होती. माजी आमदार पाटील यांना याच गावात २०१४ मध्ये १०८ व २०१९ मध्ये २२१ मते मिळाली होती. बागल यांना २०१४ मध्ये ६३ व २०१९ मध्ये ३१ मते मिळाली होती.