करमाळा (अशोक मुरूमकर) : कमी दाबाने होणाऱ्या वीज पुरवठ्यामुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. याकडे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून ऊसाच्या लागवडी झाल्या आहेत. काहीजण गहू, हरभरा पेरत आहे. मात्र वीज पूर्ण दाबाने मिळत नसल्याने शेतकरी त्रासला आहे.
पोथरे, आळजापूर, बाळेवाडी, बिटरगाव श्री भागात पूर्ण दाबाने वीज मिळत नसल्याची शेतकऱ्यांची तक्रार आहे. याबाबत वारंवार वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती देऊनही दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप शेतकऱ्यांचा आहे. यावर्षी पाऊस चांगला झाला असून शेतकऱ्यांनी जादा पाण्याची पिके घेतली आहेत. काहींचे ऊस कारखान्याकडे गाळपासाठी गेले आहेत. त्यामुळे सर्वांचे विद्युत पंप सुरु झाले आहेत. काही शेतकऱ्यांचे ऊस गाळपाला गेले नसून त्यांनाही पाणी देण्याची आवश्यकता आहे. परंतु वीज मिळत नसल्याने शेतकरी संताप व्यक्त करत आहेत. डिसेंबरमध्येच अशी परस्थिती असेल तर उन्हाळा सुरु झाल्यानंतर आणखी प्रश्न गंभीर होईल, अशी भीती शेतकरी व्यक्त करत आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अन्यथा आंदोलन केले जाईल, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला आहे.