बार्शी (सोलापूर) : इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी घटनास्थळ पंचनामा देण्यासाठी तक्रारदाराला लाच मागणाऱ्या पोलिस हवालदाराला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने शनिवारी (३० नोव्हेंबर) पकडले आहे. राहुल इरण्णा सोनकांबळे (वय 52, वैराग पोलिस ठाणे) असे संशयित आरोपीचे नाव आहे. त्यांनी तक्रारदाराकडे 20 हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती मध्यस्थीमार्फत ही लाच देण्याचे ठरले होते. यामध्ये मनोज किशोर वाघमारे (वय 40, रा. सिद्धार्थनगर, वैराग, बार्शी) या संशयित मध्यस्थीवरही गुन्हा दाखल झाला आहे.
यातील तक्रारदार यांचे वडील रोड अपघातामध्ये गंभीर जखमी झाल्याने वैराग पोलिस ठाणे येथे 11 ऑक्टोबरला गुन्हा दाखल झाला होता. या गुन्ह्याचा तपास संशयित आरोपी सोनकांबळे यांच्याकडे आहे. या अपघाताच्या घटनास्थळ पंचनामाची कागदपत्रे हे यातील तक्रारदार यांना इन्शुरन्स क्लेम करण्यासाठी आवश्यक होती. त्यांनी याबाबत सोनकांबळे यांच्याशी संपर्क साधला. तेव्हा त्यांनी घटनास्थळ पंचनामा कागदपत्र देण्यासाठी 20 हजार रुपये लाचेची मागणी केली. तडजोडीअंती 15 हजार रुपये स्वीकारण्यास संमती देऊन लाच रक्कम गुन्हा दाखल झालेला संशयित दुसरा आरोपी वाघमारे यांचे मार्फत सोनकांबळे यांनी स्वतः करिता स्वीकारली. या दोघानांही सापळा रचून लाचलुचपत विभागाने रंगेहात पकडले आहे.
पोलिस उपअधीक्षक गणेश कुंभार, पोलिस अंमलदार श्रीराम घुगे, प्रमोद पकाले, राजू पवार, राहुल गायकवाड यांचा या पथकात समावेश होता. लाचलुचपत प्रतिबंधक पुणे विभागाचे अधीक्षक पोलिस शिरीष सरदेशपांडे, अपर पोलिस अधीक्षक डॉ. शीतल जानवे खराडे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. ‘कोणी शासकीय अधिकारी व कर्मचारी कोणतेही शासकीय काम करण्यास फी व्यतिरिक्त लाचेची मागणी करीत असल्यास तात्काळ संपर्क साधावा,’ असे आवाहन पोलिस उप अधीक्षक कुंभार यांनी केले आहे.