करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता संपताच करमाळ्याच्या कर्तव्यदक्ष अधिकारी तहसीलदार ऍक्शन मोडवर आल्या आहेत. निवडणूक काळात रखडलेली रस्ता केस व दुरुस्तीची कामे त्यांनी हाती घेतली असून वाळू माफियांनाही त्यांनी कारवाईचा इशारा दिला आहे.
विधानसभा निवडणूक प्रक्रिया यशस्वीरीत्या झाल्यानंतर आज (सोमवारी) सर्व शासकीय कार्यालयात नागरिक कामानिमित्त आले असल्याचे दिसले. सर्व यंत्रणाही कामाला लागली आहे. महसूल विभागाकडे रस्ता केस, पुरवठा विभाग, नावातील व क्षेत्र दुरुस्ती, विविध दाखले अशी कामे रखडलेली होती. ती कामे लवकरच मार्गी लावली जाणार आहेत, असे तहसीलदार ठोकडे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना सांगितले आहे.
निवडणुकीमुळे साधणार १५० रस्ता केसची प्रकरणे प्रलंबित होती. त्याची स्थळ पहाणी करून निकाल दिले जाणार आहेत. निवडणुकीपूर्वीही त्यांनी विक्रमी रस्ता केसची प्रकरणे निकाली काढली होती. बेकायदा वाळू उपसा करणाऱ्यांवरही त्यांनी जोरदार कारवाई केली होती. मुरुम काढण्यासाठीही परवाना घेण्याचे आवाहन त्यांनी केले होते. त्यामुळे महसुलातही मोठी वाढ झाली आहे. येणाऱ्या काळातही बेकायदेशीर कामे कोणी करू नयेत. परवाना घेऊन शासकीय रक्कम भरून कामे करावीत, प्रशासन पूर्ण सहकार्य करत आहे, कोणीही गैरसमज करू नयेत, असे आवाहन त्यांनी केले आहे. रस्ता केसमध्ये कोणाचीही अडवणूक होऊ नये म्हणून प्राधान्याने निकाल दिले जातील, असेही त्या म्हणाल्या आहेत.