करमाळा (सोलापूर) : केंद्र सरकारच्या १० हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या धोरणांतर्गत करमाळा तालुक्यामध्ये राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीची स्थापना झालेली. नाबार्डच्या अर्थसहाय्यातून या कंपनीची यशस्वी वाटचाल सुरू आहे. दोन वर्षामध्ये कंपनीने दोन कोटीपेक्षा अधिक उलाढाल केली आहे. वॉटर शेड ऑर्गनायझेशन ट्रस्टच्या प्रयत्नांमधून व वॉलमार्ट फाउंडेशनच्या निधीमधून कंपनीच्या सभासदांसाठी प्रो राईस हा संयुक्त भागीदारी प्रकल्प तालुक्यामध्ये राबविला जात असून या प्रकल्पांतर्गत विषमुक्त भाजीपाला व विषमुक्त शेती करण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.
याच प्रकल्पामधून कंपनीच्या सभासदांनी पाणी बचतीचे तंत्र आत्मसात करावे यासाठी प्रोत्साहनपर पाच हजार अनुदान जाहीर करण्यात आले आहे. ठिबक सिंचन किंवा स्प्रिंकलर खरेदी केल्यास सभासदांना शासकीय अनुदानाव्यतिरिक्त थेट पाच हजार रुपयांचे अनुदान दिले जाणार आहे. कंपनीच्या सभासदाला एक एकरसाठी पाच हजार अनुदान असणार आहे. एकापेक्षा जास्त एकरसाठी ठिबकची खरेदी केली तरी अनुदान एकच एकरचे दिले जाणार आहे. जास्तीत जास्त शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर अनुदान देणे हा या प्रकल्पाचा उद्देश असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष डॉ. विकास वीर यांनी दिली.
डॉ. वीर म्हणाले, कंपनीचे सभासद या अनुदानाचा लाभ घेऊ शकतात. या व्यतिरिक्त कंपनीने दुसऱ्या टप्प्यातील शेअर्स विक्री सुरू केली असून जे सभासद नव्याने शेअर्स घेतील त्यांना सुद्धा या अनुदान योजनेचा लाभ घेता येणार आहे. ठिबक हे जैन कंपनीचे आयएसआय मार्क असलेलेच ठिबक सभासदांनी खरेदी करणे बंधनकारक असणार आहे. कंपनीचे महिला सभासद कमी असल्यामुळे दुसऱ्या टप्प्यांमध्ये नाबार्डच्या धोरणानुसार महिला सभासदांसाठी फक्त २१०० हे सभासद मूल्य ठेवले असून त्याचा फायदा महिला शेतकऱ्यांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी केले आहे.