करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील गोयेगाव येथे जलसंपदा विभागाच्या जागेवर अतिक्रमण केल्याप्रकरणी तिघांविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. दगडू मछिंद्र कांबळे, मछिंद्र मदिबा कांबळे व दिगंबर गुलाब कांबळे (सर्व रा. वाशिंबे, ता. करमाळा) अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे आहेत. यामध्ये भीमा उपसा सिंचनच्या केत्तूर शाखेच्या शाखाधिकारी सहाय्यक अभियंता श्रेणी २ श्रद्धा राजेंद्र मगदूम यांनी फिर्याद दिली आहे.
गोयेगाव येथे जलसंपदा विभागाची उजनी धरणासाठी गट नंबर ८४ व ८५ ही जागा संपादित आहे. या गटामध्ये गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींनी अतिक्रमण केल्याची तक्रार मे २०२४ मध्ये केत्तूर शाखेकडे आली होती. त्यानंतर संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी स्थळ पहाणी केली होती. तेव्हा या गटात भराव टाकून विहीर खोदण्यात आली होती. यामुळे क्षेत्राचे नुकसान झाले असून पाणी साठ्यावर परिणाम होत आहे. ज्या उद्देशाने धारण उभारण्यात आले आहे तो उद्देश यामुळे साध्य होत नसून हा प्रकार चुकीचा आहे. त्यामुळे यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला, असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.