करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा एसटी बस आगारातून कुर्डुवाडी- करमाळा एसटी बस वेळेत सोडण्यात यावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी आगार प्रमुखांकडे केली आहे. याबाबत आज (गुरुवारी) संतप्त विद्यार्थ्यांनी लेखी निवेदन दिले आहे. वरकुटे, अळसुंदे, सालसे आदी ठिकाणावरून येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे. करमाळा आगारातून सकाळी व सायंकाळी सुटणारी बस वेळेवर सुटत नाही. त्यामुळे सकाळी शाळा व महाविद्यालयात येणाऱ्या विद्यार्थ्यांची गैरसोय होत आहे.
महाविद्यालय सुटल्यानंतर विद्यार्थिनींना घरी जाण्यासाठी उशीर होत आहे. त्यामुळे शेतात रहाणाऱ्या मुलींना घरी जाण्यासाठी उशीर होत असल्याने शाळा बंद करा, असे पालक सांगत आहेत. यामुळे मुलींच्या शिक्षणावर परिणाम होऊ शकतो. शाळा व महाविद्यालयात येण्यासाठी सध्या विद्यार्थी सालसेपर्यंत ट्रॅक्टर व खासगी वाहनांचा वापर करत आहेत.
जीव धोक्यात घालून विद्यार्थी येत आहेत. मात्र परांडा- स्वारगेट एसटी बस या विद्यार्थ्यांना घेत नाही. त्याचाही परिणाम शिक्षणावर होत आहे. काही दिवसात विद्यार्थ्यांची परीक्षा सुरु होणार आहे. मात्र वेळेत बस येत नसल्याने अभ्यासावरही परिणाम होत आहे. रोज चालत जाणे व वाहने शोधणे यात वेळात जात असून याकडे गांभीर्याने पाहून एसटी बस सुरु करावी, अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली आहे.