करमाळा (अशोक मुरूमकर) : दोन दिवसांपूर्वी करमाळा आगाराची कर्जतवरून करमाळ्याला येताना रावगावजवळ वळणावर एक एसटी बस उलटली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिकांनी तत्काळ मदत केल्याने यातील सर्व प्रवाशी काढण्यास यश आले. घटनेचे गांभीर्य पाहून घटनास्थळी अनेकांनी मदत केली. पोलिसही हजर झाले होते. प्रथमदर्शनींच्या म्हणण्यानुसार एसटीचा रॉड तुटल्याने बस रस्त्याच्या खाली गेली. झाडामुळे दुर्घटना टाळली. नाहीतर शेजारी असलेल्या घरावरही गाडी गेली असती आणि यापेक्षा जास्त गंभीर घटना घडली असती. या घटनेत चालकावर निष्काळजीपणे बस चावली असल्याचा ठपका ठेवण्यात आला असून एका ८० वर्षाच्या प्रवाशाच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल झाला आहे. वास्तविक करमाळा आगारातील एसटी बस नादुरुस्त आहेत. याबाबत अनेकदा माध्यमातून आवाज उठवला जातो आहे. तरीही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे. एखादी अशी घटना घडल्यानंतर चालकाला दोषी ठरवण्यापेक्षा स्थानिक जे दावा करत आहेत त्याचीही चौकशी करणे आवश्यक आहे.
करमाळा आगारात सतत एसटी बस बंद पडत आहेत. याबाबत अनेकदा नागरिक तक्रारी करत आहेत. त्यावर अजूनही मार्ग निघालेला नाही. मोडकळीस आलेल्या या बसमधून सेवा दिली जात आहे. अनेक एसटी बसला खिडक्या, बाकडी व्यवस्थित नाहीत. अशा स्थितीत जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागत आहे. अशा बस मार्गावर सोडणे योग्य आहे का? यामध्ये एखाद्याचा जीव जाऊ शकतो. बस उलटली त्यात ८० वर्षाचे आजोबा सांगतात त्याप्रमाणे चालकाची चूक असेलही. पण याच गाडीत इतर प्रवाशांचेही म्हणणे ऐकणे आवश्यक आहे. गाडीचा रॉडच तुटला असेल तर त्याने गाडी कशी आवरायला हवी याचाही विचार होणे आवश्यक आहे.
अपघात झाला तेव्हा पोलिसही घटनास्थळी आले होते. करमाळा आगारापासून अवघ्या १० किलोमीटरवर ही घटना घडली होती. पोलिस तत्काळ येथे आले होते. आणि त्यांनी मदतकार्यही केले. जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर आगारप्रमुख होनराव घटनास्थळी आले होते. नादुरुस्त बस आणि दुर्लक्ष यामुळे त्यांना संतप्त नागरिकांनी घेरले होते. त्यांना याबाबत जाबही विचारला होता. त्यानंतर त्यांनी गाडीची पाहणीही केली आणि त्यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालयात जाऊन जखमी प्रवाशांशी संवाद साधला. त्यातही अनेकांनी घटनाक्रम सांगितला होता. मात्र त्यानंतरही चालकाचा दोष असल्याचे सांगत गुन्हा दाखल होणे हे दुर्दैवी आहे.
करमाळा आगारातील एसटी बस नादुरुस्त असल्याचे अनेकदा निदर्शनास आले आहे. आरटीओचा अहवाल यामध्ये काय आहे? हे पहाणे आवश्यक आहे. अनेक जखमींना उपचाराची आवश्यकता आहे. इतर प्रवाशांचे व प्रथमदर्शनीचे यामध्ये काय म्हणणं आहेही पहाणे आवश्यक आहे. फक्त चालकला दोष देऊन अशा घटनेत चालणार नाही. तर प्रवाशांना विश्वास बसेल अशी सुविधा देण्यासाठी आणि आपण सुखरूप प्रवास करू अशा चांगल्या सुस्थितीतील बस देणेही आवश्यक आहे. यात खरोखर चालकाची चूक असले तर त्याच्यावर कारवाई व्हावी. मात्र त्याच्यावर कारवाई होण्याआधी सत्य परिस्थितीही पहाणे गरजेचे आहे. याबाबत तुम्हाला काय वाटते आम्हाला कळवा.