करमाळा (सोलापूर) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या कुंभेज येथील चौथ्या पंपाचे काम सुरु आहे. साध्य दहिगाव उपसा सिंचन योजनेचे रब्बी आवर्तन सुरु असून या आवर्तनामध्ये टेल मायनारपर्यंत घोटी व नेर्ले भागापर्यंत पाणी पोहचले असून या भागतील बंधारे, तलाव, नालबंदारे, नाला बिल्डिंग भरून घेतले आहेत. कुंभेज येथील पंपहाऊसमधील चौथा पंप नादुरुस्त होता. याची दुरुस्ती तातडीने करण्याची सूचना आमदार नारायण पाटील यांनी दिली.
यावर कुंभेज येथील पंप हाऊस दोन मध्ये युद्ध पातळीवर काम सुरु असून लवकरच हे काम पूर्ण होईल. त्यामुळे काही दिवसात पंप हाऊस एक दहिगाव व पंप हाऊस दोन येथील सर्व पंप पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करतील. 2019 नंतर कधीही ही योजना दहा पंप सुरु करून चालवली नव्हती. परंतु आमदार पाटील यांनी दहा मोटारीने पाणी उपसा करून लाभ क्षेत्रातील सर्व भागात पाणी देण्याचे ठरवले आहे.
पंपहाऊस दोन येथील काम सुरु असल्यामुळे काही काळापुरता पाणीपुरवठा स्थगित राहील असे आवाहन करण्यात आले आहे. दहिगाव येथील सहा व कुंभेज येथील चार हे सर्व पंप पूर्ण क्षमतेने पाणी उपसा करतील तसेच दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या रब्बी आवर्तनास ३० दिवसाची मंजुरी मिळाली होती. आमदार पाटील यांनी मंजुरी वाढवून १५ दिवस आवर्तन देण्यात यावे, अशी मागणी पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्याकडे केली. यावेळी उपअभियंता जलसंपदा विभाग राजगुरू व अभियंता आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पंपहाऊस १ व पंपहाऊस दोन मधील कर्मचारी परिश्रम घेत आहेत.