करमाळा (सोलापूर) : शेतीला पूर्णदाबात वीज मिळत नसल्याने पोटेगाव सबस्टेशनवरील संतप्त शेतकऱ्यांनी आज (मंगळवारी) महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या करमाळा उपकार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले आहे. याची दखल घेऊन पूर्ण दाबाने वीज दिली नाही तर आंदोलन केले जाईल, असा इशारा निवेदनाद्वारे देण्यात आला आहे.
पोटेगाव सबस्टेशनवरून सीना नदी काटावरील गावांना वीज पुरवठा होतो. सध्या नदीला पाणी आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या ऊसाच्या लागणी सुरु आहेत. मात्र पुरेशा प्रमाणात वीज मिळत नाही. त्यामुळे संताप व्यक्त केला जात आहे. सीना नदीला पाणी आहे तोपर्यंत पुरेशी वीज मिळणे आवश्यक आहे. अन्यथा पीक जळून जाणार आहेत. याकडे गांभीर्याने लक्ष द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांची आहे.