करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात मेन रोडवर रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर व विना नंबर प्लेटसह फॅन्सी नंबर प्लेट लावणाऱ्या वाहन चालकांवर करमाळा पोलिसांनी धडक कारवाई सुरु केली आहे. कर्णकर्कश हॉर्न लावणारेही सध्या पोलिसांच्या रडारवर आहेत. पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई सुरु आहे.
करमाळा शहरात सायंकाळी 5 ते 7 वाजताच्या वेळेत रहदारीच्या ठिकाणी, करमाळा एसटी बस स्टॅन्ड परिसर व मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावरून अनावश्यक वाहने उभा करून अडथळा करणाऱ्यांवर कारवाई केली जात आहे. यासाठी पोलिसांनी पायी पेट्रोलिंग केली आहे. यावेळी तीन पोलिस अधिकारी व 15 पोलिस कर्मचारी उपस्थित होते.
रहदारीस अडथळा निर्माण करणाऱ्या वाहनांवर व विना नंबर प्लेट, फॅन्सी नंबर प्लेट अशा वाहनांवर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. तसेच रिक्षाचालकांना युनिफॉर्म व इतर सुरक्षिततेबाबत पोलिस निरीक्षक घुगे यांनी सूचना दिल्या आहेत. सोने चांदीचे दुकानदार, मोठे कापड दुकानदार, मोबाईल दुकानदार यांनी दुकानाचे सिक्युरिटी करिता दुकानात व दुकानासमोरील रोडवर सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याबाबत सूचना त्यांनी दिल्या आहेत.