करमाळा (अशोक मुरूमकर) : पालकमंत्री जयकुमार गोरे हे काल (रविवारी) सामूहिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने करमाळा दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान करमाळ्याचे आमदार नारायण पाटील व पालकमंत्री गोरे यांच्यातील भेट अवघ्या काही मिनिटात हुकली आहे. हा योगायोग होता की ठरवून झालेले नियोजन याबाबत राजकीय वर्तुळात तर्कवितर्क लावले जात आहेत.
पालकमंत्री गोरे हे वधूवरांना आशीर्वाद देऊन बाहेर पडत होते. दरम्यान त्यांना माध्यम प्रतिनिधींनी प्रवेशदरवराजवळ गाठले. माध्यमांशी ते बोलत होते तेव्हा आमदार पाटील हे वधू- वरांना आशीर्वाद देण्यासाठी आले असून त्यांचे स्वागत असे निवेदक सांगत होते. मात्र पालकमंत्री गोरे हे माध्यमांशी बोलले आणि तसेच पुढे मार्गस्थ झाले.
आमदार पाटील हे शरद पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार आहेत. लोकसभा निवडणुकीत त्यांनी महायुतीला (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची साथ) सोडून ‘तुतारी’ हाती घेतली होती. विधानसभा निवडणुकीत अपक्ष आमदार संजयमामा शिंदे व महायुतीचे उमेदवार दिग्विजय बागल यांचा पराभव केला. भाजपचे गणेश चिवटे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या विवाह सोहळ्याला ते उपस्थित होते. पालकमंत्री मंचावरून गेल्यानंतर ते तेथे आले. याबाबत निवेदक धंनजय शिंदे यांनी त्यांचे स्वागत केले. या विवाह सोहळ्याला सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. एका राजकीय प्रश्नाबाबत बोलताना हा राजकीय कार्यक्रम नसल्याचे सांगत पालकमंत्री गोरे यांनी राजकीय बोलणे टाळले. आमदार पाटील व गोरे हे एकाच कार्यक्रमात असताना त्यांची भेट टाळली. हा योगायोग होता की राजकीय डाव याबाबत राजकीय वर्तुळात तर्क लावले जात आहेत.