करमाळा (सोलापूर) : दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंदनलिका वितरण प्रणालीचे त्वरित सुरू करा या मागणीसाठी राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष भारत अवताडे यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या समर्थकांनी व महायुती घटक पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी करमाळा-कुर्डूवाडी रस्त्यावरील अर्जुननगर फाटा येथे शुक्रवारी रास्ता रोको केला. या योजनेचे पाईप जाळण्याचा तपास करून संशयित आरोपींवर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. दरम्यान दहिगाव उपसासिंचन योजनेचे उप अभियंता संजय राजगुरू यांनी आंदोलनकर्त्यांचे निवेदन स्वीकारले.
३० मेपर्यंत काम सुरू करण्याचे आश्वासन यावेळी देण्यात आले. त्यावर अवताडे यांनी काम सुरु झाले नाही तर ५ जूनला विधानभवनावर घंटानाद आंदोलन करण्याचा इशारा दिला. यावेळी सहाय्यक पोलिस निरीक्षक रोहित शिंदे यांनी पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
माजी आमदार शिंदे यांनी दहिगाव उपसा सिंचन योजनेच्या बंद नलिका वितरण प्रणालीचे काम मंजूर करून घेतले होते. गेल्यावर्षी या कामाला सुरुवात झाली होती. विधानसभा निवडणुकीनंतर राजकीयद्वेषातून या कामाला विरोध झाला. त्यातूनच या योजनेचे काम बंद पाडून दोन वेळा पाईप जाळण्याचा प्रकार झाला. खुल्या पाणी वहनामुळे मर्यादित प्रमाणात असलेले पाणी लाभक्षेत्रातील २४ गावांना शेवटपर्यंत पोहोचत नसल्याचे सांगत बंदनलिका योजना शेतकऱ्यांना लाभदायी ठरणार आहे.
त्यातूनच बंदनलिका वितरण प्रणालीच्या समर्थनार्थ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष अवताडे यांच्या नेतृत्वाखाली रस्ता रोको झाले. याला भाजपाचे गणेश चिवटे, मनसेचे संजय घोलप व नानासाहेब मोरे यांच्यासह विविध संघटनांनी पाठिंबा दिला. हनुमंत मांढरे, घोटीचे सरपंच विलास राऊत, शितल क्षिरसागर, विवेक येवले, विकास वीर यांनी यावेळी मनोगत व्यक्त करत योजनेचे फायदे सांगितले.