करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळा तालुक्यातील कमलाई साखर कारखाना यावर्षी गाळप हंगामासाठी सज्ज झाला आहे. कारखाना सुरू करण्यासाठी ३०० वाहनांचे ऊस वाहतूक करार करण्यात आले असून कारखान्याने ९ लाख टन गाळपाचे उद्दिष्ट ठेवले आहे. कारखान्याकडे साधारण ५ हजार हेक्टर ऊसाची नोंद झाली असून कारखान्याचे देखभाल दुरुस्तीचे काम सुरू आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन विक्रम शिंदे यांनी दिली आहे.
शिंदे म्हणाले, यावर्षी पूर्ण ताकदीने कारखाना गाळप करुन शेतकऱ्यांना न्याय देणार आहे. यापूर्वीची शेतकऱ्यांची सर्व ऊस बीले दिलेली आहेत. कोणतेही बील राहीलेले नाही. गाळप हंगामात परिसरातील कारखान्याबरोबर ऊस दर दिला जाणार आहे. ११ दिवसांत शेतकऱ्यांना ऊसाचे बील बँक खात्यात दिले जाणार आहे. गेल्यावर्षी कारखाना कार्यक्षेत्रात पुरेसा ऊस नव्हता त्यामुळे गाळप हंगाम सुरू करण्यात अडचणी आल्या होत्या. कारखाना सुरू केला असता तर गाळपासाठी होणारा खर्च आणि उत्पन्न यात मोठा फरक पडला असता. यात शेतकरी व कारखान्याचे नुकसान झाले असते. कारखान्याची परिस्थिती अडचणीत होती. कारखाने अडचणीतून बाहेर काढण्यासाठी सर्वांनी सहकार्य करणे आवश्यक आहे, असेही ते म्हणाले.