करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरातील जुन्या सर्कल कार्यलायाला माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी भेट दिली. तालुक्यातील तलाठी व सर्कल कार्यालयासाठी शिंदे यांनी चार कोटी 20 लाख निधी मंजूर केला होता. करमाळ्यातील कार्यालयाचे काम लवकरच सुरु होणार असल्याचे सांगितले जात आहे.
महसूल विभागातील मंडळ अधिकारी व तलाठी कार्यालय बांधकामासाठी डिसेंबर 2023 च्या पुरवणी अर्थसंकल्पात शिंदे यांनी निधी मंजूर केला होता. काही ठिकाणी तलाठी कार्यालये नाहीत तर काही ठिकाणची मोडकळीला आलेली आहेत. त्यामुळे शिंदे यांनी तलाठी व सर्कल कार्यालय बांधकामासाठी प्रत्येकी 15 लाखप्रमाणे 28 बांधकामासाठी निधी मंजूर केला होता.
करमाळा शहरातील जुन्या सर्कल कार्यालयाला भेट दिली तेव्हा मंडळ अधिकारी राजेंद्र पांडेकरे, तलाठी निलेश मुरकुटे, तलाठी विनोद जवणे आदींनी त्यांचे स्वागत केले. राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष भरत अवताडे, अश्फाक जमादार, सुजित बागल, विवेक येवले आदी यावेळी उपस्थित होते.