करमाळा (सोलापूर) : वीट येथील सामाजिक व राजकीय क्षेत्रात कार्यकर्त असलेले उदय ढेरे (वय ४२) यांचे आज (बुधवारी) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास निधन झाले. त्यांच्या अकाली निधनामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. माजी आमदार जयवंतराव जगताप, राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) तालुकाध्यक्ष संतोष वारे, ऍड. अजित विग्ने यांच्यासह करमाळा तालुक्यातील त्यांच्यावर प्रेम करणारे शिंदे, जगताप, पाटील व बागल गटातील शेकडो कार्यकर्ते अंत्यविधीवेळी उपस्थित होते. करमाळा पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील यांनी करमाळा उपजिल्हा रुग्णालय येथे भेट देऊन दुःख व्यक्त केले होते. ढेरे यांच्या पश्चात पत्नी, आई, एक मुलगा, एक मुलगी, भाऊ, भावजई असा परिवार आहे.
ढेरे यांच्याबद्दल माजी आमदार संजयमामा शिंदे यांनी सोशल मीडियावर भावनिक पोस्ट केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, ‘आज सकाळी करमाळा तालुक्यातील माझा जिवाभावाचा सहकारी उदय ढेरे यांच्या निधनाची बातमी ऐकून मन सुन्न झाले. उदय आज आपल्यात नाही हे सत्य स्विकारायला मन तयार नाही. सदैव हसतमुख असणारा आणि सर्वांशी मनमोकळेपणाने वागणारा, दिलखुलास स्वभावाचा उदय माझ्या अणि सर्वांच्या नेहमीच आठवणीत राहील. इथून पुढे देखील करमाळा तालुक्यात काम करत असताना उदयची उणीव नेहमीच भासेल. वीटच्या विकासासाठी तळमळीने काम करणारा कार्यक्षम सरपंच म्हणून उदयचे काम हे खूप आदर्शवत आणि इतरांना प्रेरणा देणारे होते. गावचा विकास व्हावा, गावात बदल घडावा ही त्याची प्रामाणिक भावना होती. त्यासाठी त्याने घेतलेले कष्ट हे अतिशय वाखानण्याजोगे होते. करमाळा तालुक्यात काम करायला सुरुवात केल्यापासून प्रत्येक चांगल्या- वाईट प्रसंगात मनापासून दिलेल्या साथीबद्दल उदय मी तुझा नेहमीच ऋणी राहील’, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे.
ढेरे यांच्या निधनाने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या पत्नी वंदना या वीटच्या लोकनियुक्त सरपंच होत्या तर आई रंजना यांनी देखील वीटचे उपसरपंच म्हणून काम पाहिले होते. करमाळ्यात एका खाजगी रुग्णालयात त्यांना सकाळी उपचारासाठी दाखल केले होते. मात्र उपचारापूर्वी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर त्यांचे पार्थीव करमाळा उपजिल्हा रुग्णालयात श्वविच्छेदनासाठी दाखल केले आहे. वीट येथील तळे वस्ती येथे दुपारी दीड वाजताच्या सुमारास त्यांच्यावर अंतसंस्कार झाले.