करमाळा (सोलापूर) : करमाळा- टेंभुर्णी महामार्गावर शेलगाव चौकात भरधाव वेगात आलेल्या कंटनेरच्या धडकेत एका दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान सोलापुरात मृत्यू झाला आहे. याबाबत करमाळा पोलिसात हलगर्जीपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या अनोळखी चालकाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शुक्रवारी (ता. ८) रात्री साडेआठ वाजताच्या सुमारास हा अपघात झाला होता. बापूराव उर्फ पिंटू श्रीरंग केकाण (वय ४५, रा. शेलगाव वा) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. यामध्ये विशाल हरिश्चंद्र केकाण (वय ३६) यांनी फिर्याद दिली आहे.
मृत्यू झालेले केकाण यांच्या गाडीला शुक्रवारी मागून कंटेनरने धडक दिली. त्यात ते जखमी अवस्थेत पडले. त्यानंतर कंटेनर निघून निघून जात असताना त्याला पेट्रोल पंपावर पकडले. केकाण यांच्या डोक्याला मार लागल्याने कानातून, नाकातून मोठ्या प्रमाणत रक्तश्राव झाला. जेऊर प्राथमिक उपचार केंद्रात उपचार करून त्यांना सोलापूर येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपच्चार रुग्णालयात दाखल केले. दरम्यान उपचारापूर्वीचा त्यांना डॉक्टरांनी मृत घोषित केले.