करमाळा (अशोक मुरूमकर) : महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या कर्मचाऱ्याला शिवीगावळ करून सुरु असलेल्या वीज उपकेंद्राचे काम बंद पडल्याप्रकरणी रावगाव येथील एकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल झाला आहे. राजेंद्र सदाशिव निलंगेकर (रा. रावगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपीचे नाव आहे. वीज वितरण कंपनीचे कर्मचारी सोमनाथ दुधे यांनी यामध्ये फिर्याद दिली आहे.
रावगाव येथे महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीचे वीज उपकेंद्र होत आहे. करमाळा ग्रामीण 2 अंतर्गत हे काम सुरू असून तेथे एमएसईबीची एक एकर जागा आहे. त्या जागेवर हे काम सुरू आहे. त्या जमिनी लगत संशयित आरोपी निलंगेकर यांची जमीन आहे. मंजूर झालेल्या वीज उपकेंद्राचे काम सुरू असताना ते तेथे आले व सफसफाईचे काम करणाऱ्या जेसीबीला त्यांनी थांबवले.
वरिष्ठ अधिकारी सुनील पवार यांच्या सूचनेनुसार दूधे हे तेथे उपस्थित होते. तेव्हा निलंगेकर यांनी येथे कोणतेही काम करायचे नाही, असे दूधे यांना सांगितले. त्यावर त्यांना हे सरकारी काम सुरू असून काम थांबवू नका, असे सांगत असताना त्यांनी शिवीगाळ करून दमदाटी केली व धक्काबुकी करून काम बंद पाडले. यामध्ये सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.