करमाळा (सोलापूर) : बागल गटाच्या ताब्यात असलेल्या श्री मकाई सहकारी साखर कारखान्याने गेल्यावर्षीचे शेतकऱ्यांचे ऊस बिल दिले नसल्याने आज (मंगळवार) तहसील कार्यालयासमोर बोबाबोब आंदोलन झाले. या दरम्यान एका संतप्त शेतकऱ्याने अधिकाऱ्यांसमोरच अंगावर पेट्रोल ओतून घेऊन पेटवून घेत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. उपस्थित पोलिसांच्या सतर्कतेमुळे येथील अनर्थ टळला आहे.
मकाई सहकारी साखर कारखाना स्थापनेपासून बागल गटाच्या ताब्यात आहे. गेल्यावर्षी गाळप झालेल्या उसाचे अद्याप शेतकऱ्यांना पैसे मिळाले नाहीत. संगोबा येथे झालेला आमरण उपोषणावेळी दिलेली मुदतही संपून गेली आहे. तरीही पैसे देण्यात आले नाहीत. त्यामुळे शेतकरी आक्रमक झाले आहेत. बँकेकडे कर्ज प्रकरणाचा प्रस्ताव अद्याप मंजूर झाला नसल्याने पैसे देण्यास विलंब झाला असल्याचे कारण खासगीत बोलताना दिले जात आहे. मात्र शेतकऱ्यांना खर्चायला आता पैसेच नसल्याने संतापाची तीव्रता वाढत चालली आहे.
गाळप उसाच्या साखरेचा एक कणही शिल्क नाही मग पैसा कोठे गेला असा प्रश्न सत्ताधारी बागल गटाला आंदोलनकर्ते करत आहेत. प्रशासनाने तत्कालीन व सध्याच्या संचालक मंडळावर गुन्हे दाखल करून त्यांच्या मालमत्तेवर बोजा चढवून शेतकऱ्यांचे पैसे द्यावेत, अशी मागणी केली जात आहे. या आंदोलनावेळी प्रा. रामदास झोळ, शेतकरी संघर्ष समितीचे दशरथ कांबळे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे रवींद्र गोडगे, पंचायत समितीचे माजी सदस्य ऍड. राहुल सावंत आदी उपस्थित होते. उपविभागीय अधिकारी प्रियांका आंबेकर, प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव पोलिस निरिक्षकः ज्योतीराम गुंजवटे आदी यावेळी उपस्थित होते. प्रशासनाकडून गुन्हा दाखल करण्याबाबत कायदेशीर मार्गदर्शन घेतले जात असून शेतकऱ्यांचे पैसे मिळावेत यासाठी कायदेशीररित्या प्रयत्न सुरु असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले आहे.