पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा 2022 पासून तालुक्यांमध्ये सुरू आहे. यावर्षी शेलगाव क येथील कृषी क्रांती शेतकरी गटाने या स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवून कामाला सुरुवात केली. गटाच्या बैठका सदस्यांच्या घरी घेत असतानाच या बैठका पटसंख्येच्या अभावी बंद पडलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या ठिकाणी घेतल्या तर बरे राहील हा विचार पुढे आला आणि अवघ्या पाच दिवसांमध्ये शाळेचे रूप बदलण्याचे काम या शेतकरी गटाने केले.
ग्रामपंचायत व गटशिक्षणाधिकारी यांची परवानगी घेऊन सदर शाळेची दुरुस्ती आणि रंगरंगोटी करण्यास 5 एप्रिलला गटाने सुरुवात केली. 6 वर्षापासून बंद असलेल्या या शाळेमध्ये घाणीचे साम्राज्य होते. शाळेत असलेली लाईट फिटिंग तुटलेली होती, सारं अस्ताव्यस्त. शाळा वर्ग खोल्या, शौचालय, प्रांगण याची स्वच्छता करण्याबरोबरच भिंतींना नव्याने प्लास्टर करणे, रंगरंगोटी करणे, लाईट फिटिंग करणे ही कामे लोकवर्गणी आणि श्रमदानातून गटातील सदस्यांनी केली आणि शाळेचे रुपडं पालटून गेलं. फक्त शाळा नटवणे, सजवणे यापुरते मर्यादित न राहता आज मराठी नववर्ष दिन गुढीपाडव्याचे औचित्य साधून विषमुक्त शेतीची गुढी तसेच वृक्ष संवर्धनाची गुढी ही गटाने उभी केली. विषमुक्त शेतीच्या गुढीमध्ये कीटकनाशके वापरू नका, असे सांगतानाच जैविक खते, औषधे वापरा, टेन ड्रम थेरीचा वापर करा, जीवामृत, दशपर्णी अर्क वापरा हा संदेश दिला.
गटातील सदस्यांना जमाखर्च लिहिण्याची सवय लागावी या उद्देशाने जमा खर्च लिहिण्याचा संकल्पही आज गटातील सर्व सदस्यांनी केला. टाकाऊपासून टिकाऊ या उद्देशातून मुलांनी वापरलेल्या जुन्या वह्यांची लिहिलेली पाने काढून त्याला गटाचे स्टिकर चिटकवून गटातील सदस्यांना मान्यवरांच्या हस्ते जमा खर्च नोंदवह्याचे वाटप करण्यात आले. शेतीविषयक माहिती मिळावी ज्ञान मिळावे या हेतूने शेतकरी ग्रंथालय या शेतकरी भवनमध्ये उभारण्यात आले असून या ग्रंथालयामध्ये शेतीशी संबंधित अंक येत असून विषमुक्त शेतीचा प्रचार करणारे पुस्तके व शेती विषयक माहिती देणारी पुस्तके ग्रंथालयात ठेवण्यात आलेली आहेत. याचा फायदा गटाच्या भविष्यकालीन वाटचालीसाठी निश्चितच होणार आहे.
शेतकरी भवन व शेतकरी ग्रंथालयाचे उद्घाटन तसेच विषमुक्त गुढी व वृक्ष संवर्धनाची गुढी उभारणी प्रसंगी गावच्या सरपंच यमुना वीर, उपसरपंच लखन ढावरे, पाणी फाउंडेशनचे तालुका समन्वयक प्रतिक गुरव, माजी सरपंच अशोक काटुळे, माजी सरपंच आत्माराम वीर, माजी उपसरपंच कविता वीर, ग्रामपंचायत सदस्य धर्मराज शिंदे, राहुल कुकडे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. गटाच्या वतीने फार्मर कप स्पर्धे अंतर्गत विशेष शेती शाळा प्रोजेक्टरद्वारे शेतकऱ्यांना दाखविली जाणार आहे.