भरधाव वेगात आलेल्या दहा टायर टिपरची कारला समोरून धडक; शेलगावमधील पती- पत्नीसह मुलगा जखमी

करमाळा (अशोक मुरूमकर) : कुंभेज फाटा ते भिगवण रस्त्यावर मांजरगावजवळ एका भरधाव वेगात आलेल्या दहा टायर टिपरने कारला समोरून जोराची धडक दिली आहे. यामध्ये कार उलटली असून पती- पत्नी व मुलगा जखमी झाले आहे. कारचालकाच्या फिर्यादीवरून टिपरचालकाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. टिपर चालकाने मद्यप्राशन केले होते, असे फिर्यादीत म्हटले आहे.

रविवारी (ता. ११) शेलगाव (वा) येथील राहुल रमेश घोगरे (वय ४८, सध्या रा. रावेत प्राधिकरण, पुणे, व्यवसाय खासगी नोकरी) हे पत्नीसह कुंभेज फाटा मार्गे भिगवणकडे कारने जात होते. मांजरगावजवळ पावणेसात वाजता आले तेव्हा समोरून एक दहा टायर टिपर भरधाव वेगात वेडावाकडा आलेला त्यांना दिसला. त्याने कारला धडक दिली. त्यात कार रस्त्याच्या बाजूला जाऊन उलटली. यात घोगरे यांच्या मानेला लागले. पत्नी किशोरी यांच्या डाव्या पायाला व मुलगा सत्येन याच्या डाव्या हाताच्या कोपऱ्याला लागले आहे. स्थानिकांनी त्यांना मदत करत गाडीतून बाहेर काढले. टिपर चालकाने अपघात झाल्यानंतर मदत न करता पळून गेला. त्याचे नाव समजू शकलेले नाही. त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास करमाळा पोलिस करत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *