करमाळा (सोलापूर) : राशीन येथून भावाचे नवीन घर पाहून करमाळ्यातून कुर्डुवाडीमार्गे सोलापूरला जात असलेल्या महिलेची ७४ हजाराची सोन्याची पाटली चोरीला गेले आहे. याबाबत करमाळा पोलिसात अनोळखी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. छाया बंडेश पांढरे (वय ७०, रा. बुद्धलेगल्ली बाळीवेस, सोलापूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे. याचा पुढील तपास सुरु आहे.
करमाळा ते कुर्डुवाडी प्रवासादरम्यान रविवारी (२४ नोव्हेंबरला) ही चोरी झाली आहे. पांढरे या राशीनला भावाचे नवीन घर पहाण्यासाठी गेल्या होत्या. तेथून कुर्डुवाडी मार्गे त्या सोलापूरला जात होत्या. करमाळ्यातून दुपारी साडेबारा वाजताच्या बसमध्ये त्या सोलापूरकडे निघाल्या. तेव्हा करमाळा स्टॅण्डवर एसटीबसला गर्दी होती. बसमध्ये बसण्यासाठी जागा नसल्याने त्या उभा राहिल्या. कुर्डुवाडीत त्यांना सीटवर बसण्यासाठी जागा झाली. तेव्हा त्यांच्या उजव्या हातातील सोन्याची पाटली नसल्याचे लक्षात आले. त्यांनी बसमध्येही शोध घेतला. भावाच्या घरीही याबाबत माहिती दिली. मात्र तेथेही पाटली सापडली नाही.