करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री आदिनाथ सहकारी साखर कारखान्यावर प्रशासकीय अधिकारी व संचालक यांनी गैरव्यहावर केला आहे. यांची चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे तालुकाप्रमुख देवानंद बागल यांनी प्रसिद्दीपत्रकाद्वारे केली आहे. कारखान्याचे प्रशासक बाळासाहेब बेंद्रे हे महिन्यातून दोनवेळा कारखान्यावर येतात मात्र त्यांच्या गाडीचे भाडे 45 हजार लावले जात आहे. प्रशासकीय संचालक त्यांना मदत करत आहेत, असा आरोप त्यांनी केला आहे.
सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसिद्धीसाठी दिलेल्या पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, काही दिवसापूर्वीच कारखान्यातून जप्त करण्यात आलेली वाहने बेकायदा भंगारात तोडून विकली, असे समोर आले होते. सुरक्षा विभाग व शेती विभाग यांच्याकडेच याबाबतचे दप्तर आहे. मात्र कारखान्याकडे अजून नोंद नाही. भावनगर येथून इलेक्ट्रिक साहित्य खरेदी केले आहे मात्र यामध्ये जुन्या मोटारी असून त्यांना फक्त कलर दिला आहे. इतर साहित्य अंदाजे किंमत दोन ते तीन लाख रुपये आहे त्याचे बिल 13 ते 14 लाख काढले आहे.
पुढे बोलताना त्यांनी म्हटले आहे की, जुन्या कर्मचाऱ्यांना 50 टक्के पगारीवर घरी बसविले आहे. तर नवीन 30 ते 40 कर्मचारी भरती केले आहे. वास्तविक या कर्मचाऱ्यांची गरज नव्हती. काही दिवसांपूर्वी सुरक्षा रक्षकालाच एमडीची जबाबदारी दिली आहे. हा प्रकार चुकीचा आहे. माँलेसेसमध्येही गैरव्यहावर झाला आहे. कारखाना परिसरातील कर्मचाऱ्यांच्याही अनेक अडचणी आहेत. याला प्रशासक बेंद्रे, प्रशासकीय संचालक महेश चिवटे, संजय गुटाळ हे जबाबदार आहेत, असा आरोप करत याची कायदेशीर चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी बागल यांनी केली आहे.