करमाळा (सोलापूर) : मांगी रोडच्या ‘एमआयडीसी’ प्लॉटचे दर कमी करावेत, अशी मागणी राष्ट्रवादीचे (शरद पवार) करमाळा शहराध्यक्ष ऍड. शिवराज जगताप यांनी केली आहे. त्यांनी शरद पवार यांची भेट घेऊन निवेदनाद्वारे ही मागणी केली आहे. यावेळी आप्पासाहेब झांजुर्णे, रामवाडीचे सरपंच गौरव झांजुर्णे, अरुन टांंगडे, आझाद शेख, संतोष वारगड, जावेद शेख उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, करमाळा येथील औद्योगिक वसाहतीची जागा अधिग्रहित करण्यात आलेली आहे. सरकारने काही दिवसापासून प्लॉट विक्री संदर्भात प्रक्रिया सुरू केली होती. परंतु याबाबत उद्योजकांमध्ये उदासीनता दिसून येत आहे. प्लॉटचे दर चढ्या भावाने आहेत. महाराष्ट्रातील इतर औद्योगिक संस्थाचे दर पाहिले तर करमाळा औद्योगिक वसाहत व इतर औद्योगिक वसाहतीमध्ये फरक आहे. सरकारने याकडे गांभीर्याने पाहिले पाहिजे. सुशिक्षित बेरोजगार यांना उद्योगधंदे वाढवण्यासाठी औद्योगिक वसाहतीमध्ये आपल्या उद्योगाची उभारणी करावयाची आहे. परंतु गेले अनेक वर्षापासून प्लॉट विक्रीचे दर जास्त आहेत. दरम्यान पवार यांनी याबाबत उद्योगमंत्र्याशी बोलून बैठक लावण्यात येईल, असे आश्वासन दिले.