करमाळा (अशोक मुरूमकर) : अनेक दिवसांपासून लक्ष लागलेल्या भाजपच्या तालुकाध्यक्ष व शहराध्यक्षांची नियुक्ती नुकतीच झाली आहे. यामध्ये जगदीश अग्रवाल यांची पुन्हा शहराध्यक्ष म्हणून वर्णी लागली आहे तर तालुकाध्यक्ष म्हणून रामभाऊ ढाणे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गणेश चिवटे यांची जिल्हा सरचिटणीस म्हणून नियुक्ती झाल्यानंतर तालुकाध्यक्ष म्हणून कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
गेल्या काही दिवसांपासुन भाजपच्या नव्या पदाधिकारी निवडीकडे सर्वांचे लक्ष लागले होते. तालुक्यात नव्या कार्यकारणीत कोणाला संधी मिळणार याची सर्वांना उत्सुकता होती. त्यात शहराध्यक्षपदाची माळ अग्रवाल यांच्या गळ्यात टाकून पक्षश्रेष्टींनी त्यांच्यावर पुन्हा विश्वास टाकला आहे. जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी या निवडी केल्या आहेत. ‘भाजपच्या सर्व वरिष्ठांचे, मार्गदर्शक, पदाधिकारी व संघटन मंत्री मकरंद देशपांडे, खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार रणजीतसिहं मोहिते पाटील, जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, संघटन सरचिटणीस धैयशिल भैया मोहिते पाटील, राजकुमार पाटील यांनी माझ्यावर विश्वास ठेवून पुन्हा एकदा काम करण्याची संधी दिली असून पुन्हा जोमाने काम करणार’ असल्याचे अग्रवाल यांनी सांगितले आहे.