महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एखादा मोठी घडामोड घडली आहे. राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतर अजित पवार यांनी तिसऱ्यांदा आज (रविवारी) उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. पवार हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये सामील झाले. त्यानंतर सोशल मीडियावर मात्र ‘मिम्स’चा पाऊस पडला आहे.
सांगोल्याचे आमदार शहाजीबापू देशमुख यांचा शिवसेनफुटीवेळी प्रसिद्ध झालेला ‘काय झाडी, काय डोंगर काय झाडी हा डायलॉग प्रसिद्ध झाला होता. त्यानंतर आता ‘राष्ट्रवादी काँग्रेसच्या ४० आमदारांची तक्रार आणि नाराजीही… आम्हाला थेट राजभवनात नेले?डोंगार, झाडी, हाटील आणि गुवाहाटी नाय दाखवली’, एकनाथ शिंदे यांचा फोटो वापरत ‘सासूमुळे वाटणी केली आणि सासूच वाट्याला आली’ याशिवाय ‘एवढा खेळखंडोबा करण्यापेक्षा सगळे पक्ष एकत्र येऊन सरकार बनवा आणि जनतेला विरोधी पक्षात बसवा’, गोपीचंद पडळकर यांचा फोटो वापरत ‘याला काय अर्थ हाय? आम्ही काय बोलायचं का नाय?’, अण्णा हजारे यांचा डोक्यावरील टोपीला हात लावलेला फोटो वापरत ‘कोणाविरुद्ध उपोषण करावे तेच कळत नाही’, ‘मतदान कार्ड विकणे आहे; ‘राष्ट्रवादी नको म्हणून शिंदे बाहेर पडले, आता भाजपनेच राष्ट्रवादीला घेतले आता कुठं जाणार?’, अजित पवार यांचा पहाटेच्या शपथविधी वेळचा फोटो वापरत आधी पहाटे आता दुपारी अजित पवार यांनी झोप मोड केली’, ‘महाराष्ट्रच्या राजकारणाची वाट लावली’, असा एक राज ठाकरे यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे.
इंदुरीकर महाराज यांचे ‘कार्यकर्ते टेन्शनमध्ये’ असा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी व राहुल गांधी यांचा फोटो वापरत ‘आता हे दोघेच उरलेत… हे एकत्र आले की आपण मतदार डोळे मिटायला तयार’, ‘मंत्री मंडळ विस्तार गुवाहाटीवाले बसा…’ असे विनोदी मिम्स व जोक सध्या प्रचंड व्हायरल झाले आहेत.
महाराष्ट्राच्या राजकारणात साडेतीन वर्षांपूर्वी विधानसभा निवडणूक झाल्यानंतर सुरुवातीला अजित पवार व देवेंद्र फडणवीस यांचा पहाटेचा शपथ सोहळा झाला होता. तेव्हा फडणवीस हे मुख्यमंत्री तर पवार हे उपमुख्यमंत्री होते. हे सरकार दीड दिवसात कोसळले होते. महाविकास आघाडी स्थापन झाली आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री तर पवार दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. त्यानंतर वर्षभरापूर्वी शिवसेनेत फूट पडली आहे आणि शिंदे मुख्यमंत्री झाले. तर फडणवीस हे उपमुख्यमंत्री झाले. आता पुन्हा एखादा मोठा राजकीय भूकंप झाला आहे. शिवसेना व भाजपच्या युतीत राष्ट्रवादीचे पवार हे सामील झाले आहेत. पवार हे शिंदे सरकारमध्ये उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आहे. यामुळे राजकीय चर्चा रंगल्या आहेत.