करमाळा (अशोक मुरूमकर) : राष्ट्रवादीच्या (उपमुख्यमंत्री अजित पवार गट) निवडीत करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे यांचे वर्चस्व असल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार दीपक साळुंखे यांनी जिल्ह्यातील कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यामध्ये आमदार शिंदे यांचे समर्थक वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, मांगीचे सुजित बागल, फिसरचे भारत अवताडे आदींची वर्णी लागली आहे.
राष्ट्रवादीमध्ये फूट पडल्यानंतर शरद पवार व अजित पवार असे दोन गट मानले जाऊ लागले आहेत. सोलापूर जिल्ह्यात शरद पवार गटाच्या राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष बळीरामकाका साठे हे काम पाहत आहेत. तर अजित पवार गटाचे जिल्हाध्यक्ष म्हणून साळुंखे यांची नियुक्ती झाली होती. त्यानंतर तालुक्काध्यक्ष कोण होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते.
साळुंखे यांनी जिल्ह्यातील कार्यकारणी जाहीर केली आहे. त्यानुसार करमाळा तालुक्यातील चंद्रकांत सरडे, सतीश शेळके, अशपाक जमादार यांची जिल्हा कार्य सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रांतीक सदस्य म्हणून बाळकृष्ण सोनावणे व तानाजी झोळ यांची नियुक्ती झाली आहे. तालुकाध्यक्ष म्हणून भारत अवताडे तर तालुका कार्याध्यक्ष म्हणून माणिक पाटील यांची निवड करण्यात आली आहे.दत्तात्रय फंड यांची करमाळा शहराध्यक्ष व अश्रू तांबे यांची शहर कार्याध्यक्ष म्हणून निवड झाली आहे. विधानसभा अध्यक्ष म्हणून चंद्रहास निमगिरे व विधानसभा कार्याध्यक्ष म्हणून सुजित बागल यांची निवड करण्यात आली आहे.