करमाळा (अशोक मुरूमकर) : रामराजे निंबाळकर यांच्याशी आमची चर्चा झालेली आहे. त्यांच्याशी फोनही झालेला आहे. योग्यवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हेच निर्णय देतील, अशी खात्री असल्याचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी करमाळ्यात माध्यमांशी बोलताना सांगितले आहे. यावेळी आमदार संजयमामा शिंदे व आमदार जयकुमार गोरे उपस्थित होते.
आमदार संजयमामा शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात आज (सोमवारी) प्रमुख पदाधिकाऱ्यांची आढावा बैठक झाली. त्यानंतर खासदार निंबाळकर यांनी माध्यमाशी संवाद साधला. खासदार निंबाळकर म्हणाले, करमाळ्यातील पदाधिकाऱ्यांकडून संपूर्ण मतदारसंघाचा आढावा घेण्यात आला. यावेळी त्यांनी मांडलेल्या प्रश्नांची सोडवणूक केली जाणार आहे. रामराजे निंबाळकर यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले, आमदार जयकुमार गोरे व आमचे रामराजे यांच्याशी बोलणे झाले आहे. त्यांच्याशी फोनवरही चर्चा झाली आहे. योग्यवेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांचा निर्णय जाहीर करतील.