करमाळा (सोलापूर) : करमाळा येथील सुभाष चौकाच्या नामांतरणाला विरोध झाल्यानंतर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून प्रशासनाने उद्या (रविवारी) सकाळी ११ वाजता दोन्ही गटाची सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. सुभाष चौक हे नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या स्मरणार्थ दिलेले नाव असल्याचा दावा ज्येष्ठ पत्रकार विवेक येवले यांनी केला आहे. तर या चौकाचे नाव श्रीराम चौक असे करण्यात यावे अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल यांनी केली होती. दरम्यान सुभाष चौकाचे नाव बदलण्यात येऊ नये, अशी मागणी करमाळा शहरातील समविचारी, सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी एकत्र येऊन निवेदनाद्वारे प्रशासनाकडे केली होती. त्यामुळे या विषयावर चर्चा- विचारविनिमय करण्यासाठी व निर्णय घेण्यासाठी रविवारी २१ जानेवारीला सकाळी ११ वाजता करमाळा पोलिस ठाणे येथे पोलिस व प्रशासनाने दोन्ही बाजूच्या कार्यकर्त्यांची बैठक आयोजित केली आहे, या बैठकीला सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन येवले यांनी केले आहे.

