All three parties will benefit if RPI get proper representation in the assembly

पुणे : लोकसभा निवडणुकीत एनडीएला अपेक्षित यश मिळाले नसले, तरी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडियाला योग्य ते प्रतिनिधित्व मिळेल, अशी आम्हाला अपेक्षा आहे. योग्य ते प्रतिनिधित्व मिळाल्यास त्याचा फायदा महायुतीमधील तीनही पक्षांना निश्चित होईल, असा विश्वास केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री तथा रिपाइंचे राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी व्यक्त केला.

रामदास आठवले यांनी आज (मंगळवार) पुण्यातील व्हीआयपी विश्रामगृहात पत्रकार परिषद घेतली. पक्षाचे शहराध्यक्ष संजय सोनवणे, राज्य संघटक परशुराम वाडेकर, सूर्यकांत वाघमारे, गौतम सोनवणे, शैलेश चव्हाण, अशोक शिरोळे, श्याम सदाफुले, मोहन जगताप, महिपाल वाघमारे, वसंत बनसोडे आदी उपस्थित होते.

आठवले म्हणाले, पुण्यात गणेशोत्सव उत्साहात साजरा करण्यात येत आहे. गणेशोत्सव हा सर्व धर्मीयांच्या एकतेचे प्रतीक बनला आहे. केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकार देशातील नागरिकांच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे. मोदी सरकारच्या धोरणांमुळे देशातील २५ कोटी लोकांना आम्ही गरीबीच्या बाहेर आणू शकलो. शेतकऱ्यांना विविध योजनांच्या माध्यमातून आम्ही १३ हजार कोटी आजवर दिलेले आहेत. १० लाख लोकांना सरकारी नोकऱ्या देण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये एसी-एसटीच्या उमेदवारांना योग्य ते प्रतिनिधित्व मिळालेले आहे.

आठवले यांनी सांगितले की, गेल्या लोकसभा निवडणुकीत महायुतीला अपेक्षित जागा प्राप्त झाल्या नाहीत. संविधान बदलाचा मुद्दा विरोधकांनी जोरदारपणे लावून धरल्यामुळे जनतेत एक वेगळा संदेश गेला. तसेच मराठा आंदोलनाचाही फटका महायुतीला बसला होता. परंतु आगामी विधानसभा निवडणुकीत मात्र चित्र उलटे दिसून येईल.

राज्यातील महायुती सरकारने जनतेसाठी अनेक चांगल्या योजना राबवल्या आहेत. लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची एक मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीला चांगल्या जागा मिळतील, असा विश्वास आठवले यांनी व्यक्त केला. दरम्यान, इंदू मिल येथील भारतरत्न डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्मारक पूर्ण करण्यासाठी मोदी सरकारच्या वतीने साडेतीन हजार कोटी रुपये खर्च करण्यात येत आहेत. हे भव्य स्मारक लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी मी व्यक्तीशः प्रयत्नशील आहे. येत्या दोन वर्षांमध्ये हे स्मारक पूर्ण झालेले सर्वांना दिसून येईल.

सध्या महाराष्ट्रात मराठा आरक्षणावरून मोठे रणकंदन होते आहे. परंतु मराठा समाजाला आरक्षण प्राप्त व्हावे, ही केंद्र व राज्य सरकारची खूप इच्छा आहे. त्यामुळे जरांगे पाटील यांनी उठसूठ आंदोलनाची धमकी देण्याऐवजी त्यांनी सरकारला योग्य ते सहकार्य करावे. त्यातून मराठा समाजाच्याच समस्या सुटतील. सवर्णांच्या आरक्षणाबाबत मोदी सरकार आधीपासूनच सकारात्मक असल्या कारणामुळेच १० टक्के आरक्षण हे सवर्णांना देण्यात आलेले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी रिपाइंच्या वतीने महायुतीतील पक्षांकडे १२ जागांची मागणी केली आहे. ही मागणी त्यांनी पूर्ण करावी, त्याचे कारण हे की, रिपाइंमुळे महायुतीतील तीनही प्रमुख पक्षांना चांगला फायदा होणार आहे. त्यामुळे या सर्व पक्षांनी आपापल्या कोट्यातील चार-चार जागा आम्हाला द्याव्या, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

जात पडताळणी प्रमाणपत्र तात्काळ मिळावेत
जात पडताळणी प्रमाणपत्राची प्रकरणे लवकर निकाली लागत नसल्याच्या तक्रारी माझ्याकडे आल्या आहेत. मी त्यावर गांभीर्याने विचार करतो आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र न मिळाल्याने मेडिकलसह विविध ठिकाणांहून एससी- एसटीच्या विद्यार्थ्यांचे प्रवेश रद्द होत असल्याच्याही तक्रारी येत आहेत. त्यामुळे यासंदर्भात मी लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करेन व यासंदर्भात अधिकाऱ्यांची एक बैठक घेईल. कुणाही विद्यार्थ्याचे नुकसान होणार नाही, या दृष्टीने कटाक्षाने प्रयत्न केले जातील.

मालवण पुतळ्या प्रकरणी कठोरात कठोर कारवाई करावी
स्वराज्याचे प्रणेते छत्रपती शिवाजी महाराज यांचा मालवण येथे उभारण्यात आलेला पुतळा वाऱ्यामुळे पडला, त्याबाबत सध्या राज्यभरात मोठे रणकंदन होते आहे. झालेला प्रकार अत्यंत दुर्दैवी आहे. महापुरुषांचे पुतळे बनवताना मोठी काळजी घेणे गरजेचे आहे, कारण त्यांच्याशी जनतेच्या भावना जुळलेल्या असतात. त्यामुळे महाराजांचा पुतळा पडणं ही घटना मनाला वेदना देणारी आहे. हे काम देताना योग्य त्या व्यक्तीला दिले गेले नाही. परंतु ज्यांनी-ज्यांनी हे काम केले आहे आणि ज्याने पुतळा बनवला आहे, त्या सर्वांवर कायदेशीरदृष्ट्या कठोरात कठोर कारवाई करावी, अशी मागणी आठवले यांनी पत्रकार परिषदेत केली.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *