करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्यात अंगणवाडी सेविका व मदतीनीसच्या रिक्त जागा भरण्याची प्रक्रिया सुरु आहे. मात्र या भरतीत अर्थकारण झाले असल्याची चर्चा असून काही ठिकाणी तक्रारी झाल्या आहेत. त्यातूनच करमळ्यातील एका अधिकाऱ्यांची बदली करण्यात आली असल्याची चर्चा आहे. मात्र राज्यातील ५३ अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. करमाळ्यातील बदली बाबत उलटसुलट चर्चा सुरु आहे.
करमाळ्यात महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून आनंद जाधव यांच्याकडे प्रभारी म्हणून पदभार होता. त्यांच्या काळात सुरु असलेली अंगणवाडी सेविका व मदतनीस भरती वादात सापडली आहे. यादीत नाव आलेल्या उमेदवारांवर तक्रारी झाल्या आहेत. त्याची सुनावणी होणार आहे. आर्थिक तडजोडीत काही चुकीची नावे यादीत प्रसिद्ध केली असल्याचा आरोप केला जात असून याबाबत चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यामुळे नव्याने येत असलेले बाल विकास प्रकल्प अधिकारी के. सी. सुर्यंवशी कसा अहवाल देतात हे पहावे लागणार आहे.
करमाळ्यात अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची निवड करताना प्रसिद्धी करणात देण्यात आलेल्या अटींची पूर्तता न करता काही उमेदवारांची नावे यादीत जाहीर झाली आहेत. तर काही ठिकाणी अर्जात त्रुटी असताना त्याची पडताळणी न होता पात्र उमेदवारांना डावलले असल्याचे आरोप आहेत. याबाबत काही उमेदवार यांनी लेखी तक्रारी केल्या आहेत. विवाह नोंदणी व रहिवाशी यामध्ये तापवत असल्याचे पुरावे नाव न जाहीर करण्याच्या अटीवर ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलकडे देण्यात आले आहेत. यावर काय निर्णय होतो हे पहावे लागणार आहे. याच दरम्यान नवीन अधिकाऱ्याची निवड झाल्याने चर्चा रंगल्या आहेत.