करमाळा (अशोक मुरूमकर) : करमाळ्याच्या तहसीलदारपदी शिल्पा ठोकडे यांची नियुक्ती झाली आहे. बुधवारी (ता. 13) सकाळी त्या करमाळा तहसील कार्यालयात येणार आहेत. सोलापूर येथे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांची भेट घेऊन त्या कुर्डवाडी येथे प्रांताधिकारी कार्यालयात गेल्या होत्या. मात्र उशीर झाल्याने त्या करमाळा तहसील कार्यालयात येऊ शकल्या नाहीत.
एप्रिलमध्ये तहसीलदार समीर माने यांची बदली झाली. तेव्हापासून करमाळ्याचा पदभार विजयकुमार जाधव यांच्याकडे होता. करमाळ्याला नवीन तहसीलदार कोण येणार याची उत्सुकता सर्वांनाच लागलेली होती. राज्यात भाजप, शिवसेना व राष्ट्रवादीचे सरकार आहे. त्याचा परिणाम तालुक्याला तहसीलदार मिळण्यावरही झाला होता. खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार नारायण पाटील यांच्यातील राजकीय संघर्षामुळे तहसीलदार नियुक्ती लांबली होती, अशी चर्चा तालुक्यात होती. मात्र करमाळ्यातील नागरिकांचे अनेक प्रश्न लांबले होते. मात्र आता लेडी सिंघम अशी ओळख असलेल्या ठोकडे यांची नियुक्ती झाल्याने नागरिकांच्या अपेक्षा पूर्ण होतील व प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
वेशांतर करून रात्रीत वाळूच्या १३ ट्र्क पकडून दीड कोटींचा दंड वसूल करणाऱ्या आदर्श तहसीलदार पुरस्कार प्राप्त ठोकडे यांची करमाळ्यात बदली
तहसीलदार ठोकडे ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना म्हणाल्या, ‘प्रांताधिकारी कार्यालयात वेळ झाल्याने आज वेळेत येऊ शकले नाही. बुधवारी सकाळी करमाळा तहसील कार्यालयात येणार आहे.’ ठोकडे या करमाळ्याला तहसीलदार म्हणून येणार आहेत याची चर्चा अनेक दिवसांपासून होती. मात्र कालावधी लांबल्याने पुन्हा दुसरे तहसीलदार कोण येणार आहेत यांची उत्सुकता होता. करमाळा तहसील कार्यालयात आज त्या येणार असल्याने त्यांचे स्वागत करण्यासाठी मोठी लगबग पहायला मिळाली. मात्र सायंकाळी उशिरापर्यंत त्या आल्या नाहीत. त्यामुळे पुन्हा उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. दरम्यान ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलचा तहसीलदार ठोकडे यांचा सावंद झाला आहे.
करमाळ्याला शिस्त लागेल
भाजपचे गणेश चिवटे म्हणाले, ‘ठोकडे या कर्तव्यदक्ष अधिकारी आहेत. त्यांच्यामुळे करमाळ्यातील नागरिकांचे प्रश्न सुटतीलच शिवाय चांगली शिस्तही लागेल. ठोकडे यांच्यासारख्या अधिकारी करमाळ्याला मिळाल्या आहेत याचा आनंद आहे.’
कर्तव्यदक्ष अधिकारी मिळाले
आमदार संजयमामा शिंदे गटाचे समर्थक सामाजिक कार्यकर्ते सुजीत बागल म्हणाले, ‘तहसीलदार शिल्पा ठोकडे यांना 100 पेक्षा जास्त पुरस्कार मिळाले आहेत. म्हणजे त्या नागरिकांसाठी उत्कृष्ट काम करत आहेत. त्या करमाळ्याला मिळाव्यात म्हणून आमदार शिंदे हे आग्रही होते. नागरिकांची कामे चांगली व्हावीत हा या मागचा उद्देश होता. दुष्काळामध्ये त्या चांगल काम करतील अशी अपेक्षा आहे.’
राज्यात ओळख असलेल्या अधिकारी करमाळ्याला
आदिनाथ कारखान्याचे माजी अध्यक्ष धनंजय डोंगरे म्हणाल्या, ‘लेडी सिंघम म्हणून त्यांची राज्यात ओळख आहे. असे नाव असलेले अधिकारी करमाळ्याला मिळाले आहेत, ही चांगली गोष्ट आहे. नागरिकांची रखडलेली कामे त्यांच्याकडून होतील. बागल गट त्यांच्या कामात नेहमी सहकार्य करत रहिल.’
सर्वसामान्य नागरिकांना न्याय मिळेल
पंचायत समितीचे माजी सभापती अतुल पाटील म्हणाले, ‘ठोकडे यांचे नाव ऐकले आहे. कोल्हापुरातील पैलवानांचा एक ग्रुप आहे. त्यामध्ये ठोकडे यांच्या कामाचे कौतुक झाले. कांगलमध्ये असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिकांना न्याय दिला. अधिकारी कोणतेही असले तरी पुढाऱ्यांची कामे सहसा राहत नाहीत. मात्र सर्वसामान्य नागरिकांच्या कामावर परिणाम होत असतो. मात्र ठोकडे यांच्यामुळे न्याय मिळेल. गेल्या काही दिवसांपासून राहिलेली कामे मार्गी लागतील, ही अपेक्षा आहे. पाटील गट त्यांचे स्वागत करत आहे.’
या आहेत तक्रारी…
- रस्ता केसमधील अनेक प्रकरणे प्रलंबीत असल्याच्या तक्रारी आहेत
- पुरवठा विभागात नागरिकांची प्रकरणे प्रलंबीत आहेत. दिलेल्या तालखेला निपटारा होत नाही
- सीना नदी व बॅकवॉटर भागात बेकायदा वाळू उपसा
- पीएम किसानबाबत
- जमीन वाटपाची कामे
- कर्मचारी वेळेवर हजर नसणे
अशा काही तक्रारी आहेत.