करमाळा (सोलापूर) : करमाळा विधानसभा मतदारसंघातील जिंती व म्हैसगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात पद निर्मितीला सरकारकडून मान्यता मिळाली आहे. याशिवाय वडशिवणे, उमरड, सावडी, पोफळज व गुळसडी या उपकेंद्रांनाही पदनिर्मितीला मान्यता मिळाली आहे. यामुळे आरोग्यसेवा सक्षम होण्यास मदत होईल, असा विश्वास आमदार संजयमामा शिंदे यांनी व्यक्त केला आहे. राज्य सरकारच्या या उपकेंद्र व प्राथमिक आरोग्य केंद्रांसाठी लवकरच बाह्ययंत्रणेद्वारे पद भरती होऊन ही आरोग्य केंद्रे सुरू होतील.
आमदार शिंदे म्हणाले, सोलापूर जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो तेव्हापासून करमाळा मतदार संघातील प्राथमिक आरोग्य केंद्र व उपकेंद्रांच्या बांधकामासाठी निधी दिला होता. या निधीमधून इमारतींचे बांधकाम झाले. परंतु प्रत्यक्षात पदभरती नसल्यामुळे या इमारती पडून होत्या. यासंदर्भात पाठपुरावा केल्याने यश आले असून या आरोग्य उपकेंद्रांमध्ये आरोग्य कार्यकर्ता, सहाय्यक परिचारिका व अंशकालीन स्त्री परिचर अशी 3 पदे भरली जाणार असून प्राथमिक आरोग्य केंद्राच्या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी गट अ, वैद्यकीय अधिकारी गट ब, आरोग्य सहाय्यक (पुरुष) गट क, आरोग्य सहाय्यक (स्त्री) गट क, सहाय्यक परिचारिका अशी 5 पदे भरली जाणार आहेत.