लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने राजकीय वातावरण चांगलेच तापू लागले आहे. महाराष्ट्रात महाविकास आघाडीविरुद्ध महायुती यांच्यातच खरी लढत होणार आहे. राष्ट्रवादीचे शरद पवार गट व अजित पवार गट, शिवसेना ठाकरे गट व शिंदे गट, कॉँग्रेस, भाजप व वंचित बहुजन आघाडीने उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. काही ठिकाणची अजूनही उत्सुकता आहे. तेथे कशी लढत होणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. बारामती मतदारसंघात माजी मंत्री शिवतारे यांनी माघार घेतल्यामुळे नणंद विरुद्ध भाउजाई अशी लढत होणार आहे. येथे अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार व शरद पवार गटाकडून सुप्रिया सुळे यांच्यात सामना पहायला मिळणार आहे. यामध्ये कोण बाजी मारणार हे पहावे लागणार आहे.
राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाकडून आज पहिली यादी जाहीर करण्यात आली. पाच मतदारसंघातील हे उमेदवार आहेत. त्यात बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळे तिसऱ्यांदा निवडणूक लढवतील. त्यांच्या नावाची घोषणा होताच काही मिनिटातच राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाकडून पहिल्या उमेदवाराची घोषणा करण्यात आली. त्यात सुनेत्रा पवार यांचे नाव जाहीर झाले. सुळे या महाविकास आघाडीच्या तर पवार या महायुतीच्या उमेदवार आहेत. गेल्या काही महिन्यांपासून अजित पवार यांच्या पत्नी पवार या निवडणूक लढणार असल्याचे स्पष्ट झाले होते. आज त्यावर शिक्कामोर्तब झाले आहे.
शरद पवार गटाकडून दिंडोरी, वर्धा, शिरुर, अहमदनगर दक्षिण व बारामती मतदारसंघातील उमेदवारांची घोषणा करण्यात आली. त्यानंतर तासाच्या आतच अजित पवार गटाकडून सुनेत्रा पवार यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. बारामती हा शरद पवार यांचा बालेकिल्ला मानला जातो. उमेदवारी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार यांनी आजचा दिवस हा माझ्या आयुष्यातील सर्वात भाग्याचा दिवस असल्याची प्रतिक्रिया दिली आहे. आज महायुतीच्या माध्यमातून मला बारातमती मतदारसंघातून निवडणूक लढवण्याची संधी मिळाली आहे. या उमेदवारीसाठी सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राज्यातील महायुतीच्या सर्व नेत्याचे आभार मानले.