करमाळा (सोलापूर) : उमरडमधील बेकायदा दारू विक्री व जुगार बंद करण्यासाठी पोलिस यंत्रणा गावकऱ्यांच्या पाठीशी आहे, असे आश्वासन पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिले आहे. बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष राजाभाऊ कदम यांच्या नेतृत्वाखाली उमरडमधील बेकायदा दारू विक्री व जुगार बंद करण्याबाबत बैठक झाली.
पोलिस निरीक्षक घुगे म्हणाले, तरुणांनी नियमित व्यायाम केला पाहिजे. अभ्यासावर लक्ष केंद्रित करून व्यवसाय व नोकरी केली पाहिजे. आई- वडिलांनी विद्यार्थ्यांना अँड्रॉइड मोबाईल देऊ नये. मोबाईल मध्ये नको ते पाहायला मिळते त्यामुळे अनेक तरुण बिघडत आहेत. ताण तणाव कमी करण्यासाठी ग्राउंडवर व्यायाम करावा, असेही त्यांनी सांगितले आहे.
गट विकास अधिकारी मनोज राऊत म्हणाले, दारूच्या आहारी गेलेल्याचे दारू सोडण्यासाठी समुपदेशन केले पाहिजे. व्यसनाच्या आहारी जाणे म्हणजे एक प्रकारचा आजारच आहे. अशा वेळेस डॉक्टरांचा सल्ला त्यांनी घेतला पाहिजे. बहुजन संघर्षनेचे जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले, उमरडमधील बेकायदा दारू विक्री मध्यंतरी बंद झाली होती. परंतु जेऊर पोलिस स्टेशन दूर लक्ष करत असल्यामुळे हा व्यवसाय सुरु झाला.
प्रा. नंदकिशोर वोलटे यांनी बेकायदा दारू विक्री बंद झालीच पाहिजे असे सांगितले. शबाना शेख व शिंदे बाई यांनी दारुड्या नवऱ्यापासून मुलापासूनआमचं जगणं मुश्किल झालं आहे दारू पिऊन आल्यानंतर भाकरी कालवन बाहेर फेकून दिले जातात मग आम्ही जगावे कसे? हणमार करतात म्हणून माहेरी पळून जावे लागते, गडी माणसं दारू पिऊन सर्व कामाचा पैसा घालवतात. अशा व्यथा सांगितल्या. जनार्धन मारकड, गणेश चौधरी, प्रमोद कुलकर्णी, विलास बदे, नामदेव कोठावळे, संदीप मारकड, समाधान वलटे, निलेश चौधरी, ज्योतीराम वलटे, श्रीमान चौधरी, दासा पाखरे, दिगंबर मारकड, भास्कर पडवळे, श्रीकांत मारकड, चांगदेव चौधारी, सत्यवान पाटील, चंद्रशेखर पाटील, दगडू हुलगे, रामा बदे, सुगर बदे आदी उपस्थित होते. आभार श्री. पाखरे यांनी मांनले.