करमाळा (सोलापूर) : ‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘हम सब एक है’, ‘आशा गटप्रवर्तक युनियनचा विजय असो’, ‘दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे’ अशा घोषणा देत सरकारचे लक्ष वेधण्यासाठी करमाळा तहसील कार्यालयासमोर आशासेविकांनी विविध मागणीसाठी आज (गुरुवारी) आंदोलन केले.
शेकडो आशासेविकांनी एकत्र येऊन आज आंदोलन केले. सरकारी सेवेत आम्हाला सामावून घ्यावे याशिवाय ऑनलाईनच्या कामातून सुटका करावी, अशी मागणी यावेळी करण्यात आली. कोणतेही प्रशिक्षण न देता ऑनलाईनची कामे आम्हाला करावी लागत आहेत. त्याचे मानधनही योग्य दिले जात नाही. त्यामुळे काम करणे अवघड होत असल्याचा आरोप करत सरकारचा निषेध करणाऱ्या घोषणा यावेळी देण्यात आल्या.
आशासेविकांनी केलेल्या या आंदोलनात देण्यात येणाऱ्या घोषणांनी सर्वांचे लक्ष वेधले. साधणार एक तासभर हे आंदोलन सुरु होते. लहान बालके घेऊन काही आशासेवीका या आंदोलनात सहभागी झाल्या होत्या. आंदोलनकर्त्यांचे प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता.
या होत्या घोषणा…
‘कोण म्हणतं देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही’, ‘हम सब एक है’, ‘आशा गटप्रवर्तक युनियनचा विजय असो’, ‘दिवाळीला बोनस मिळालाच पाहिजे’, ‘एक रुपयाचा कडीपत्ता सरकार झाले बेपत्ता’, ‘आमच्या मागण्या पूर्ण करा नाहीतर खुर्च्या खाली करा’, अशा अनेक घोषणा यावेळी देण्यात आल्या.