करमाळा (अशोक मुरूमकर) : विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर बागल गटामध्ये उत्साह वाढला आहे. स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुका लढण्यासाठी व २०२९ च्या विधानसभा निवडणुकीत दिग्विजय बागल यांना आमदार करण्यासाठी कार्यकर्ते कामाला लागले आहेत. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला असला तरी मिळालेली मते कार्यकर्त्यांना उभारी देणारी आहेत.
करमाळा तालुक्याच्या राजकारणात बागल गट हा महत्वाचा आहे. २०१४ पासून बागल गटाची विधानसभा निवडणुकीत पिछाडी आहे. मात्र या निवडणुकीत दिग्विजय बागल यांना मिळालेली मते महत्वाची मानली जात आहे. बागल हे या निवडणुकीत महायुतीचे उमेदवार होते. त्यांना ४० हजार ८३४ मते मिळाली असून ते तिसऱ्या स्थानावर आहेत. मात्र पडत्या काळात त्यांना मिळाली मते गटाला उभारी देणारी आहेत, असे बोलले जात आहे.
बागल गटाला आदिनाथ आणि मकाई सहकारी साखर कारखान्यावरून टार्गेट केले जात होते. त्यांना त्यामुळे संपर्कही ठेवता येत नव्हता. मात्र भाजपमध्ये प्रवेश झाल्यानंतर गटाला बळ मिळत गेले. त्यांनी मकाईचे थकीत ऊस बिलही शेतकऱ्यांना दिले. या निवडणुकीत त्यांना महायुतीची उमेदवारी मिळाली. शिवसेना (शिंदे गट) जिल्ह्या प्रमुख महेश चिवटे यांची यामध्ये महत्वाची भूमिका होती. बागल गटावरील नाराजीमुळे त्यांचे मताधिक्य मोठ्या प्रमाणात घटेल अशी शक्यता होती. मात्र ४० हजार ८३४ मतदारांनी बागल गटावर विश्वास टाकला. यामध्ये लाडकी बहीण, शिवसेना, भाजप व बागल गटाला मानणारा वर्ग आहे.
निवडणूक निकाल झाल्यानंतर बागल गटाने पत्रकार परिषद घेऊन भूमिका मांडत २०२९ मध्ये पूर्ण तयारीने उतरणार असल्याचे सांगितले. महायुतीच्या माध्यमातून आम्ही काम करणार असल्याचे सांगितले. शिवाय बागल गटाचे मार्गदर्शक विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांनी यापुढे किंगमेकर म्हणून काम न करता मार्गदर्शक म्हणूनच काम करणार असून दिग्विजय बागल यांना आमदार करणार असल्याचे सांगितले आहे. ते कसे काम करतील हे पहावे लागणार आहे. मात्र मिळालेल्या मतांमुळे बागल गटात उत्साह वाढला असल्याचे दिसत आहे.