करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील श्री मकाई सहकारी साखर कारखान्याची १७ पैकी नऊ जागांसाठी निवडणूक होत आहे. यामध्ये १४ उमेदवार रिंगणात आहे. या निवडणुकीचा बागल गटाकडून गुरुवारी (ता. ७) प्रचाराचा शुभारंभ होणार आहे. यावेळी बागल गटाकडून शक्तिप्रदर्शन केले जाण्याची शक्यता आहे. ‘शंखनाद झाला… रणशिंग फुंकले… निशाणी निश्चित झाली… आपली निशाणी कपबशी’ या मथळ्याखाली बागल गटाकडून यावेळी कार्यकर्त्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन केले जात आहे. सोशल मीडियावर हे मॅसेज फिरवले जात आहेत.
मकाई सहकारी साखर कारखान्याची १७ जागेसाठी निवडणूक जाहीर झाली होती. त्यात बागल गटाच्या ८ जागा बिनविरोध झाल्या आहेत. बागल विरोधी गटाने शेवटच्याक्षणपर्यंत अर्ज मागे न घेतल्याने नऊ जागांसाठी निवडणूक लागली आहे. यामध्ये चार उमेदवारांचे पाच ठिकाणी अर्ज आहेत. महिला राखीव, पारेवाडी ऊस उत्पादक, मांगी ऊस उत्पादक व भिलारवाडी ऊस उत्पादक गटात ही निवडणूक होत आहे. याचा प्रचार सुरु झाला आहे. बागल गटाकडून गुरुवारी (ता. ८) सकाळी ११ वाजता मांगी येथे लोकनेते स्व. दिगंबररावजी बागल (मामा) शक्तीस्थळ येथून प्रचाराला सुरुवात होणार आहे.