करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘IAS बालाजी मंजुळे हे फक्त करमाळ्याचे नाही तर महाराष्ट्राचे भूषण आहे’, असे गौरवोद्गार विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी काढले.
करमाळा तालुक्यातील खातगाव येथे ग्रामसुधार समितीच्या वतीने देण्यात येणारा ‘करमाळा भूषण’ पुरस्कार प्रा. शिंदे यांच्या हस्ते मंजुळे यांना देण्यात आला. यावेळी जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या प्रथमश्रेणी अधिकारी पदावरवरून सेवानिवृत्त झालेले राजेंद्र रणसिंग यांचा विशेष सत्कार झाला. मंजुळे यांनी अतिशय खडतर परिस्थितीत यश मिळवले आहे. सध्या ते अंधरप्रदेशातील विजयवाडा येथे राज्य ग्रामीण विकास संस्थामध्ये आयुक्त म्हणून काम पहात आहेत.

प्रा. शिंदे म्हणाले, ‘मंजुळे यांनी जिद्द व चिकाटीने यश मिळवले आहे. त्यांचा तुम्ही सन्मान केला ही कौतुकाची बाब आहे. समाजाच्या विकासासाठी योगदान देणाऱ्या व्यक्तींचा हा सन्मान संपूर्ण समाजासाठी प्रेरणादायी असतो. त्यांच्या कार्यातून प्रेरणा घेऊन समाजाने सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत राहणे गरजेचे आहे.’ ग्रामसुधार समितीचे अध्यक्ष डॉ. ऍड. बाबुराव हिरडे, जिल्हा परिषदेच्या माजी सदस्या सवितादेवी राजेभोसले, भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, श्रेणिकशेठ खाटेर, ऍड. अजित विघ्ने, संदीप काळे, नाथाजीराव शिंदे, डी. जी. पाखरे, गणेश करे पाटील, प्रा. शिवाजीराव बंडगर, व्ही. आर. गायकवाड, गजेंद्र पोळ, प्रशांत नाईकनवरे, राजेंद्र धांडे, दीपक देशमुख, कैलास लबडे, नानासाहेब साळूंके, अनिल माने, खलील शेख, संजय हांडे आदी उपस्थित होते. सुत्रसंचलन प्रा. सुहास गलांडे यांनी केले.
