करमाळा (अशोक मुरूमकर) : ‘शेटफळगढे येथील बारामती ऍग्रोने आतापर्यंत साधणार पावणेदहा लाख मेटन ऊस गाळप केले असून याची रिकव्हरी ११.४० व १०.३७ अशी आहे. तर हाळगाव येथील कारखान्याने १ लाख २८ हजार मेटन उसाचे गाळप केले असून याची रिकव्हरी ११.१६ व १०.२० अशी आहे. या दोन्ही कारखान्याचे ऊस दर जाहीर झाले असून लवकरच शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होतील’, अशी माहिती कारखान्याचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना दिली आहे.
करमाळा तालुक्यातील आदिनाथ सहकारी साखर कारखाना व मकाई सहकारी साखर कारखाना बंद आहे. तर कमलाई व शिवगिरी (विहाळ) हे कारखाने सुरु आहेत. करमाळा तालुक्यातील शेतकऱ्यांचा बारामती ऍग्रो व अंबालिका या कारखान्यांना ऊस देण्याकडे कल असल्याचे दिसत आहे. हिरडगाव, म्हैसगाव, विठ्ठल शुगर, चांदपुरी, घोगरगाव या कारखान्यांनाही मोठ्याप्रमाणात ऊस गाळपासाठी जात आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांनी ऊस दर जाहीर केले होते. मात्र पुणे जिल्ह्यातील कारखाने किती दर देतील याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. गुळवे यांनी बारामती ऍग्रोचे दर जाहीर केले आहेत. मात्र अंबालिका व दौण्ड शुगर हे कारखाने किती ऊस दर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
उपाध्यक्ष गुळवे म्हणाले, ‘बारामती ऍग्रोच्या शेटफळगडे युनिट १ या कारखान्याने आतापर्यंत पावणेदहा लाख मेटन ऊस गाळप केला असून शेतकऱ्यांच्या ऊसाला टनाला ३ हजार १०० रुपये पहिला हप्ता दिला जाणार आहे. लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात वर्ग केले जाणार आहेत. हाळगाव येथील कारखान्याने आतापर्यंत १ लाख २८ हजार मेटन ऊस गाळप केला असून शेतकऱ्यांच्या ऊसाला टनाला ३ हजार रुपये प्रमाणे पहिला दर दिला जाणार आहे. शेवटी रिकव्हरीनुसार अंतिम हप्ता दिला जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.’
पुढे बोलताना गुळवे म्हणाले, ‘कारखाना शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर देण्यासाठी कटिबद्ध आहे. वेळेत पैसे आणि चांगला दर यामुळे कारखान्यावर शेतकऱ्यांचा विश्वास वाढत आहे. करमाळा तालुक्यातील जास्तीत जास्त ऊस गाळपाला प्राधान्य दिले जात असल्याचेही’ ते म्हणाले आहेत.
