करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यात शेटफळ येथे श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा सर्वात मोठा अश्वारूढ पुतळा आहे. या पुतळ्याचे सुशोभीकरण करण्यात यावे, अशी मागणी भीम दलाचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले यांनी केली आहे.
भीम दलाचे जिल्हाध्यक्ष सुनील भोसले म्हणाले, शेटफळ येथील नागरिकांनी गेल्या काही दिवसांपूर्वी पुढाकार घेऊन श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अतिशय मोठा अश्वारूढ पुतळा उभारला आहे. यामध्ये प्रशासनाने कोणताही अडथळा न आणता सुशोभीकरण करावे. सध्या येथील रस्त्याचे काम होत आहे. इंदापूरला जाण्यासाठी कुगाव ते शिरसोडी या पूलाचेही भूमिपूजन झाले आहे. याच रस्त्यावर असलेला शेटफळ येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पुतळा सर्वांचे लक्ष वेधत आहे. मात्र या पुतळ्याचे सुशोभिकरण करण्याची गरज आहे.
शेटफळ हे गाव सामाजिक दृष्ट्या महत्वाचे गाव आहे. गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन हा पुतळा उभारला. याला जिल्ह्यातून सर्व बांधवानी पाठींबा दिलेला आहे. श्री छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व बांधवांचे आदर्श आहेत. याचे सुशोभीकरण करण्यासाठी या भागातील नागरिकांनी पुढाकार घ्यावा, काही अडचण आली तर आम्ही सर्वात पुढे राहू. हा विषय लोकभावनेचा आहे. यामध्ये सर्वांनी सहकार्य करावे, असेही भोसले यांनी म्हटले आहे.